Summer Baby Care: उन्हाळ्यात नवजात बाळांची अशी घ्या काळजी
उन्हाळ्यात नवजात बाळांचीही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण उन्हाचा कडाका वाढला की मोठ्यांप्रमाणेच नवजात बाळांनाही खूप त्रास होतो. तसेच त्यांची त्वचा अत्यंत संवेदनशील असते आणि त्यांच्या शरीरातील तापमान नियंत्रण करण्याची क्षमता अजून पूर्णपणे विकसित झालेली नसते. बऱ्याचदा पालक बाळाची काळजी घेताना नकळत काही चुका करतात. उन्हाळ्यात या चुका टाळल्या पाहिजेत.. ( Summer New Born Baby Care )
सुती कपडे
उन्हाळ्यात बाळाला कपडे घालताना ते आरामदायी असल्याची खात्री करा. त्यांना नेहमी सुती, हलके, सैल आणि मऊ कपडे घाला. सुती कपड्यांमुळे घाम शोषला जातो आणि हवा खेळती राहते. घरात असल्यावर बाळाला एकापेक्षा जास्त कपडे घालणे टाळा. तसेच त्यांना जास्त गुंडाळून ठेवू नका. बाहेर जाताना बाळाला टोपी बांधा. सुती, रेशमी किंवा लोकरीची टोपी बाळासाठी चांगली असते.
हायड्रेशन
मोठ्यांप्रमाणे लहान बाळांनाही उन्हाळ्यात सारखी तहान लागू शकते. त्यामुळे बाळ सतत रडत असेल किंवा किरकिर करत असेल तर ब्रेस्ट फिडींग करा. लक्षात ठेवा सहा महिन्यांपेक्षा लहान बाळांना वेगळे पाणी देण्याची गरज नसते, आईच्या दुधात ८०% पेक्षा जास्त पाणी असते, ते बाळाची तहान भागवण्यासाठी पुरेसे असते. पण सहा महिन्यांपेक्षा मोठ्या बाळाला तुम्ही हलक्या अन्नासह थोडे थोडे पाणी देऊ शकता.
घराचे तापमान आणि वातावरण
घरात बाळ असेल तर थंड वातावरण राखणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे दिवसा खिडक्या बंद करा आणि पडदे लावा जेणेकरून गरम हवा आत येणार नाही. संध्याकाळी खिडक्या उघडा आणि हवा खेळती राहूद्या. तुम्ही पंखा किंवा एसी वापरू शकता पण बाळाला त्याची थेट हवा लागणार नाही याची काळजी घ्या. एसीचे तापमान साधारण २४°C ते २६°C दरम्यान ठेवावे.
स्वच्छता
या ऋतूत बाळाला कोमट पाण्याने आंघोळ घालावी. जर खूप उष्णता असेल तर दिवसातून दोनदा ओल्या सुती कापडाने बाळाचे शरीर पुसून घेतले तर चांगले असते. घामामुळे बाळाच्या मानेवर किंवा अंगावर पुरळ येऊ शकतात. अशा वेळी त्यांचे शरीर कोरडे ठेवा आणि पावडरचा अतिवापर टाळा. त्याऐवजी तुम्ही अंघोळ घालण्यापूर्वी बाळाला तेलाने मालिश करू शकता.
Comments are closed.