नियम बीसीसीआयचे, पण निर्णय आरसीबीचा! ११ नंबरची जर्सी आणि काळ्या आर्म बँड्ससह आरसीबी मैदानात; नेमकं प्रकरण काय?

आयपीएल २०२६ चा गतविजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने बीसीसीआयने कठोर नियम जाहीर केलेले असतानाही मोठा निर्णय घेतला आहे. आरसीबी संघाने गतवर्षी १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. यानंतर आता यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यातील सरावाच्या वेळी संपूर्ण संघ ११ नंबरची जर्सी घालून उतरणार आहे.

आरसीबीचा संघ ट्रॉफीच्या जवळ येऊन अनेकदा जेतेपदावर नाव कोरण्यात संघ अपयशी ठरत होता, पण २०२५ मध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्त्वात संघाने ही कामगिरी करून दाखवली. पण या विजयानंतर झालेल्या विजयी रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. या ११ लोकांच्या स्मरणार्थ संपूर्ण आरसीबी संघ ११ नंबरची जर्सी घालून सरावाला उतरणार आहे. याशिवाय चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ११ सीटदेखील रिकाम्या ठेवल्या जाणार आहेत.

आरसीबीने गेल्या वर्षी पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. ४ जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या आवारात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरसीबीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. पण या मोठ्या घटनेनंतर आता आरसीबीने पुढील वर्षासाठी खूप मेहनत घेतली आहे.

“सामन्याच्या दिवशी, खेळाडू सरावादरम्यान ११ क्रमांकाची जर्सी घालतील. सामन्यादरम्यान खेळाडू नेहमीची आपल्या क्रमांकाची जर्सी घातलेले दिसतील. सरावादरम्यान सर्व खेळाडूंच्या पाठीवर ११ क्रमांकाची जर्सी लिहिलेली असेल. संघ त्यादिवशी काळी पट्टी बांधून मैदानावर उतरणार आहे. आम्ही चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ११ सीट कायमस्वरूपी तयार करण्याचाही विचार करत आहोत. ह्या जागा त्या ११ चाहत्यांसाठी आहेत. ते नेहमीच आमच्यासोबत असतील.” असे आरसीबीचे सीईओ राजेश मेनन यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितलं.

गतविजेता आरसीबी २८ मार्चला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या त्यांच्या पाच घरच्या मैदानावर सामन्यांपैकी हा पहिला सामना असेल. आरसीबी या आयपीएलमधील आपले उर्वरित दोन घरचे सामने रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळेल.

संघाचे सीईओ राजेश मेनन यांनी अशीही घोषणा केली की, तिकीटधारकांना सामन्याच्या दिवशी मेट्रोचा वापर करता येईल. पार्किंगसाठी आगाऊ नोंदणी करता येईल आणि स्टेडियमचे सर्व दरवाजे सामन्याच्या चार तास आधी उघडले जातील. त्यांनी असंही जाहीर केलं की, फ्रँचायझीने यावर्षी ‘अनबॉक्सिंग’ कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेतला असून, सामन्याच्या दिवशी सामना सुरळीतपणे पार पाडण्यावरच संपूर्ण लक्ष केंद्रित केलं जाईल.

Comments are closed.