IPL 2026: 3 संघांना अद्याप आयपीएल ट्रॉफीची प्रतीक्षा; दोन संघ तब्बल 18 वर्षांपासून विजेतेपदाच्या प्रतीक्षेत!

आयपीएलचा नवीन हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. एकदा पुन्हा 10 संघांमध्ये विजेतेपदासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. या हंगामात एकीकडे असे संघ आहेत ज्यांनी 5-5 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे, तर दुसरीकडे काही संघ असेही आहेत ज्यांना अजून एकदाही चॅम्पियन होता आलेले नाही. विशेषतः तीन संघ असे आहेत, ज्यांना आपल्या पहिल्या ट्रॉफीची प्रतीक्षा आहे. यातील दोन संघ तर पहिल्या हंगामापासून खेळत आहेत, पण नशीब काही साथ देत नाहीये.

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian premiere league 2026) या हंगामातही 10 संघ सहभागी होतील. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांनी आतापर्यंत 5-5 वेळा या जेतेपदावर कब्जा केला आहे. तसेच, एकेकाळी ट्रॉफी न जिंकणाऱ्या संघांमध्ये आरसीबी (RCB) ची गणना व्हायची. पण गेल्याच वर्षी (2025 मध्ये) संघाने आपले नशीब बदलले आणि आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली. यावेळेस रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ ‘डिफेंडिंग चॅम्पियन’ म्हणजे विजेता संघ म्हणून मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. त्यांचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध होणार आहे.

ज्या संघांनी आतापर्यंत एकदाही आयपीएल जिंकलेले नाही, त्यात पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) या नावांचा समावेश होतो. हे दोन संघ पहिल्या वर्षापासून (2008) आयपीएलचा हिस्सा आहेत, पण अजूनही त्यांच्याकडे ट्रॉफी आलेली नाही. याचबरोबर लखनऊचा संघ काही वर्षांपूर्वीच आयपीएलमध्ये सामील झाला आहे. त्यांच्यासोबतच आलेल्या गुजरात टायटन्सने एकदा ट्रॉफी जिंकली आहे, पण लखनऊची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही.

पंजाब आणि दिल्ली या दोन्ही संघांनी आपली ओळख बदलून नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. पंजाबचे नाव आधी ‘किंग्स इलेव्हन पंजाब’ होते, ते बदलून त्यांनी ‘पंजाब किंग्स’ केले. दिल्लीच्या संघाचे नाव आधी ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’ होते, त्यांनी ते बदलून ‘दिल्ली कॅपिटल्स’ केले. परंतु, नाव बदलूनही अद्याप त्यांना जेतेपद मिळवता आलेले नाही. आता या 2026 च्या हंगामात या तीनपैकी एखादा नवीन चॅम्पियन मिळणार की जुन्या 7 विजेत्यांपैकीच कोणीतरी पुन्हा बाजी मारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Comments are closed.