Jalna News – पेट्रोल पंपावर आता टाकी ‘फुल’ करता येणार नाही; दुचाकीला 200, तर चारचाकीला 2000 ची मर्यादा, जिल्हा प्रशासनाचे आदेश
इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. याची झळ हिंदुस्थानलाही बसत असून तेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे गॅस सिलिंडर घेण्यासाठी आणि वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी तोबा गर्दी उसळली आहे. राज्यातील विविध भागांमध्ये पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जालना जिल्ह्यातही हिच स्थिती असल्याने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी इंधन वितरणावर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता दुचाकीसाठी 200 रुपयाचे, तर तीन चाकी आणि चारचाकी वाहनांसाठी 2000 रुपयांची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तरीही समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेल्या अफवांमुळे नागरिकांकडून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असून रांगा लागलेल्या आहेत. परिणामी मागणी व पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झालेला आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने व इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी इंधनाबाबत आदेश पारित केले आहेत.
काय आहेत आदेश?
- दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंतच इंधन भरण्यात यावे, तर तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 2000 रुपयांपर्यंतच इंधन भरण्यात यावे.
- कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या, ड्रम इत्यादीमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
- नागरिकांनी अनावश्यक गर्दी व रांगा टाळून आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे.
- रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्यात यावा.
…तर पंपधारकांवर कडक कारवाई
प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोज आपल्या पंपावर उपलब्ध असलेला शिल्लक साठा, त्या दिवशी प्राप्त झालेला साठा व मागणी केलेला साठा याची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील. सर्व पेट्रोल पंप धारकांनी सदर आदेशाचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना यांनी स्पष्ट केले आहे. सदर आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून, हा आदेश पुढील आदेशापावेतो लागू राहील. या संदर्भात पोलीस अधीक्षक, जालना यांना पेट्रोल पंपावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच सर्व तहसीलदार, विक्री अधिकारी आणि सर्व पेट्रोल पंप मालक व व्यवस्थापक यांना आवश्यक त्या कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Comments are closed.