सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचा तिढा, सभापती राम शिंदे कायदेतज्ञांचा सल्ला घेणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीप्रसंगी झालेल्या राडय़ात शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याच्या प्रकरणात उपसभापती निलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचे निलंबन करण्याचे निर्देश दिले. मात्र, गोऱ्हे यांनी दिलेले निर्देश रद्द करण्यावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. उपसभापतींचे निर्देश फिरवताना सभापती राम शिंदे यांची अडचण झाली असून यासंदर्भात आता कायदेशीर सल्ला घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या राडय़ाप्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचे निलंबन करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गाऱेहे यांनी दिले होते; परंतु भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी, कारवाईचे अधिकार कोणाला, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळाचे अधिकार स्पष्ट केले होते. त्यानंतर सभापती शिंदे यांनी उपसभापतींच्या आदेशाला स्थगिती देत निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले होते. याबाबत आज शशिकांत शिंदे यांनी सातारा प्रकरणाचे काय झाले, असा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केल्यानंतर प्रकरण पुन्हा तापले. सभापतींनी आदेशाला स्थगिती दिल्याने विधान परिषदेत शिंदे गटाच्या आमदार मंत्र्यांनी गदारोळ घातला. त्यामुळे सभापती राम शिंदे यांनी अर्ध्या तासाकरिता कामकाज तहकूब केले. त्यानंतर त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर आपल्या निवेदनावर सांविधानिक आणि कायदेतज्ञ यांचे मत घेतल्यानंतर योग्य निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगून पुन्हा एकदा हा निर्णय राखून ठेवला.

सभापती म्हणतात…

दरम्यान, विधिमंडळाचे कार्यकारी यंत्रणेवर नियंत्रण असले तरी थेट कारवाईचे अधिकार मर्यादित आहेत. सभागृहाबाहेरील घटनांवर निर्णय घेण्याचे अधिकार कार्यकारी मंडळाचे असून चौकशी केल्यानंतर कारवाई केली जाईल, असे सभापतींनी स्पष्ट केले. या भूमिकेवर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी हरकत घेत, या निर्णयामुळे सभापतींच्या अधिकारांबाबतच प्रश्न निर्माण होत असल्याचे म्हटले. सभापती-उपसभापतींकडून सर्वसामान्यांच्या निर्णयाबाबत बैठका घेतल्या जातात, या बैठकांत घेतल्या जाणाऱया निर्णयावरच प्रश्न निर्माण होईल, असे सांगत त्यांनी निवेदनाला आक्षेप घेतला.

असे आहे प्रकरण…

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत 20 मार्च रोजी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची पत्नी प्रिया शिंदे भाजपकडून अध्यक्ष, तर राजू भोसले उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. या निवडणुकीत शिंदे गट-राष्ट्रवादी युतीने 65 पैकी 35 जागा मिळवून बहुमत मिळवले होते, तर भाजप 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. बहुमतासाठी 33 सदस्यांचा आकडा गाठणे युतीला सहज शक्य होते. मात्र या निवडणुकीत भाजपने 6 सदस्य फोडून स्वतःचा अध्यक्ष बनवला. भाजपने शिंदे गटाचे 2, राष्ट्रवादीचे 3 सदस्य फोडले आणि एका अपक्षाचाही पाठिंबा मिळवत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. या निवडणुकीदरम्यान दोन्ही गटांत झालेल्या राडय़ात चक्क मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाली होती. भाजपनेच पोलिसांना हाताशी धरून दादागिरी केल्याचा आरोप यानंतर शिंदे गटाकडून करण्यात आला होता.

Comments are closed.