दक्षिण आफ्रिकेचा मालिका विजय
पाचव्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडवर 33 धावांनी मात : मालिका 3-2 फरकाने आफ्रिकेकडे
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्यात 33 धावांच्या फरकाने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने यासह 5 सामन्यांची मालिका 3-2 अशा फरकाने आपल्या नावावर केली. उभय संघात चौथ्या सामन्यानंतर मालिका 2-2 ने बरोबरीत होती. त्यामुळे पाचवा आणि अंतिम सामना जिंकून दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची नामी संधी होती. मात्र बुधवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मैदान मारले, यामुळे यजमान न्यूझीलंडवर मायदेशात मालिका गमावण्याची वेळ ओढवली.
प्रारंभी, प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 187 धावा केल्या. यामुळे न्यूझीलंडला मालिका जिंकण्यासाठी 188 धावांची गरज होती. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 154 धावांपर्यंतच मजल मारता आली. दरम्यान, मालिकेत शानदार कामगिरी साकारणाऱ्या आफ्रिकेच्या कॉनर ईस्टरहुईझेनला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, न्यूझीलंडने आफ्रिकेविरुद्धची शेवटची टी-20 मालिका 2005 मध्ये जिंकली होती. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये 6 मालिका खेळल्या गेल्या, त्यापैकी 5 आफ्रिकेने जिंकल्या, तर एक मालिका बरोबरीत राहिली.
प्रारंभी, न्यूझीलंडने टॉस जिंकून आफ्रिकेला फलंदाजीसाठी पाचारण केले. दक्षिण आफ्रिकेने या संधीचा पूर्ण फायदा घेतला. आफ्रिकेच्या पहिल्या 5 फलंदाजांनी जबरदस्त बॅटिंग केली. टोनी डी झॉर्जी 12, वियान मुल्डर 31, रुबीन हरमन 39 धावांची खेळी साकारली. याशिवाय, युवा फलंदाज कॉनर ईस्टरहुइझेनने किवीज गोलंदाजांची धुलाई करताना 222.27 च्या स्ट्राईक रेटने 33 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांसह 75 धावांची खेळी केली. त्याला फॉरेस्टरने 21 धावांची खेळी करत मोलाची साथ दिली. यामुळे आफ्रिकन संघाला 187 धावापर्यंत मजल मारता आली. किवीज संघाकडून बेन सीयर्सने सर्वाधिक 2 बळी घेतले.
मायदेशात किवीज संघावर मालिका गमावण्याची वेळ
आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 188 धावांचा पाठलाग करताना किवीज संघाला 8 बाद 154 धावापर्यंत मजल मारता आली. न्यूझीलंडसाठी बेवॉन जेकब्सने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. याशिवाय, कर्णधार जिमी नीशमने 24 आणि डेन क्लीवरने 22 धावा फटकावल्या. टिम रॉबिन्सन 25 धावांवर धावबाद झाला. सलामीवीर क्लार्कला अपेक्षित खेळी साकारता आली नाही. तर निक केलीही 14 धावा करुन माघारी परतला. स्टार फलंदाजांनी निराशा केल्यामुळे किवीज संघाला पाचव्या व शेवटच्या सामन्यात 33 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आफ्रिकेकडून कोएत्झी, वियान मुल्डर आणि बार्टमन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 4 बाद 187 (वियान मुल्डर 31, हर्मन 39, इस्टरहुझेन 75, फॉरेस्टर 21, बेन सियर्स दोन विकेट)
न्यूझीलंड 8 बाद 154 (टीम रॉबिन्सन 25, जेकब्स 36, जिमी नीशम 24, कोएत्झी, मुल्डर आणि बार्टमन प्रत्येकी 2 बळी).
Comments are closed.