अधिवेशन आहे की लक्षवेधिशन आहे? वाढत्या लक्षवेधींवरून जयंत पाटलांचा संतप्त सवाल
हे अधिवेशन आहे की लक्षवेधिशन आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी वाढत्या लक्षवेधी सूचनांवरून संतप्त सवाल आज विधानसभेत उपस्थित केला.
अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचनांच्या वाढत्या संख्येवरून प्रश्न केला. लक्षवेधी सूचना जास्त वेळ येतात आणि नियम 293च्या वरील चर्चा संध्याकाळी उशिरा घेतात. पहिल्या दिवसापासून अखेरच्या दिवसापर्यंत लक्षवेधी सूचना सुरू आहेत, अशा शब्दात जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर लक्षवेधी सूचना घेण्यासाठी पावणे दोनशे सदस्यांनी सह्या केल्या असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणले.
त्यानंतर अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी आखाती युद्ध, गॅस तुटवडा, अजित पवार यांच्या विमानाला झालेला अपघात यावरही भाष्य केले. अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी यासाठी एफआयआर दाखल करण्याचे प्रयत्न झाले. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला यावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास नाही. यामध्ये काही काळंबेरं आहे का, असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. अपघाताची सीआयडी चौकशी सुरू आहे, पण एफआयआर दाखल करून तपास होण्यास काय हरकत आहे? सरकार एफआयआर का टाळत आहे? त्यामुळे लोकांच्या मनात शंका वाढते. एफआयआर दाखल करून ‘दूध का दूध पानी का पानी’ होऊ द्यात अशी मागणी त्यांनी केली.
Comments are closed.