ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; मराठेशाहीचा इतिहासकार हरपला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे मराठेशाहीचा इतिहास मांडणारा एक महान संशोधक आणि विचारवंत हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला होता. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी अध्यापन क्षेत्रात घालवला. त्यांची संशोधन कारकीर्द 1964 मध्ये शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे आणि राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ यांसह 25 पेक्षा अधिक मौल्यवान ग्रंथांचे लेखन व संपादन केले.

इतिहास संशोधनासोबतच समाजप्रबोधन हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यांनी 1992 मध्ये ‘महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी’ या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला 1200 पानांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ हा इतिहास संशोधनातील एक मैलाचा दगड मानला जातो. या ग्रंथाचा अनुवाद जगातील 16 भारतीय आणि अनेक परदेशी भाषांमध्ये करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यांच्या या अलौकिक कार्याची दखल घेऊन माजी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले होते. डॉ. पवार यांनी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले होते. त्यांच्या निधनाने इतिहास संधोधन क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

Comments are closed.