जगन्नाथ मंदिरात 48 वर्षांनंतर दागिन्यांची मोजणी सुरू.

रत्नतज्ञांसह बँकेचे अधिकारी उपस्थित, सर्व दागिन्यांचे डिजिटल छायाचित्रण होणार

वृत्तसंस्था/ पुरी

ओडिशातील पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या रत्न भांडाराची (खजिन्याची) मोजणी आणि सूची तयार करण्याची प्रक्रिया 48 वर्षांनंतर बुधवारी सुरू झाली. रत्न भांडारामध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची मौल्यवान रत्ने ठेवलेली आहेत. या प्रक्रियेत मंदिराचे सेवक, सरकारी बँकेचे अधिकारी, रत्न तज्ञ आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी देखील सहभागी आहेत. संपूर्ण मोजणी प्रक्रियेचे छायाचित्रण आणि व्हिडिओ चित्रीकरण करून ‘डिजिटलायझेशन’ केले जात आहे. यापूर्वीच्या 13 मे ते 23 जुलै 1978 या कालावधीत झालेल्या मोजणीत 454 सोन्याच्या वस्तू (128.38 किलो), 293 चांदीच्या वस्तू (221.53 किलो) आणि अनेक मौल्यवान रत्नांची नोंद झाली होती.

श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनानुसार रत्नांची मोजदाद करण्याचे काम दुपारी 12:09 ते 1:45 दरम्यान निर्धारित शुभ मुहूर्तावर सुरू झाले. या कामकाजादरम्यान केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला गेला. या प्रक्रियेमुळे मंदिरातील दैनंदिन पूजा-अर्चा आणि विधींवर कोणताही परिणाम होणार नाही. भाविकांना बाहेरील भागातून दर्शन घेण्याची परवानगी आहे. मोजदाद सुरू असताना मंदिराच्या आतील भागात प्रवेश बंद असेल.

श्री जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीने ठरवलेल्या नियमांनुसार, प्रथम रोजच्या दागिन्यांची त्यानंतर रत्न भांडाराच्या बाहेरील कक्षाची आणि शेवटी आतील कक्षाची मोजणी केली जाईल. आता सध्याच्या मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतील जात असल्याने हे काम लवकर पूर्ण केले जाईल. दोन रत्नशास्त्रज्ञ ओळख पटवण्यासाठी मदत करत असून प्रत्येक वस्तूचे डिजिटल छायाचित्र घेतले जात आहे. सोन्याचे दागिने पिवळ्या कापडात, चांदीचे पांढऱ्या कापडात आणि इतर वस्तू लाल कापडात गुंडाळून सहा विशेष पेट्यांमध्ये ठेवल्या जात आहेत.

Comments are closed.