हरीश राणा यांच्या स्वेच्छा मृत्यूनंतर त्यांना हार्दिक निरोप

दिल्लीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार : 13 वर्षे हरीशची सेवा करणाऱ्या कुटुंबाच्या अढळ संयमाची प्रशंसा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गाझियाबादमधील राज एम्पायर सोसायटीचे रहिवासी असलेल्या हरीश राणाचे मंगळवारी निधन झाल्यानंतर बुधवारी सकाळी दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 2013 मध्ये पंजाब विद्यापीठात बी.टेक पदवीचे शिक्षण घेत असताना चौथ्या मजल्यावरून पडल्याने हरीश राणा कोमात गेला होता. 13 वर्षांनंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच निक्रिय इच्छामरणाला परवानगी दिली होती. मंगळवारी दिल्लीतील एम्सच्या पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये हरीशचे निधन झाले. त्याची बहीण भावना हिच्या उपस्थितीत त्याचा धाकटा भाऊ आशिषने मुखाग्नी दिला. आर्थिक आणि भावनिक आव्हानांना न जुमानता 13 वर्षे हरीशची काळजी घेणाऱ्या कुटुंबाच्या अढळ संयमाची शेजारी आणि हितचिंतकांनी प्रशंसा केली.

हरीशचे वडील अशोक राणा (62) यांनी आपल्या मुलाला अखेरचा निरोप देताना लोकांना भावनिक आवाहन केले. स्मशानभूमीमध्ये त्यांनी उपस्थितांना हात जोडून ‘कोणीही रडू नका, जेणेकरून हरीशच्या आत्म्याला शांती मिळेल’, असे ते म्हणाले. अंत्यसंस्काराच्या वेळी वातावरण अत्यंत गंभीर होते. हरीशची आई निर्मला देवी यांनी हात जोडून आपल्या मुलाला भावपूर्ण निरोप दिला. याप्रसंगी सर्वच उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

अवयवदानामुळे सहा जणांना मिळणार नवे जीवन

हरीश राणाचे मंगळवारी निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्याचे अवयवदान करण्याचे ठरवले होते. डॉक्टरांच्या मते, त्याचे फुफ्फुस, दोन्ही मूत्रपिंड, डोळे आणि कॉर्निया दान करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सहा गरजू लोकांना नवीन जीवन मिळण्याची अपेक्षा आहे. या निर्णयाकडे समाजात एक प्रेरणादायी पाऊल म्हणून पाहिले जात आहे. मृत्यूनंतरही हरीशने इतरांची सेवा केली. कुटुंबाने हरीशचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अन्य कुणालातरी नवी दृष्टी लाभणार असल्याचे ब्रह्मा कुमारींशी संबंधित असलेल्या सिस्टर लवली यांनी सांगितले.

हरीश राणा 13 वर्षे कोमात

हरीश राणा गेल्या 13 वर्षांपासून कोमात होता. त्याची प्रकृती गंभीर होती. दीर्घकाळ उपचार करूनही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. अखेरीस, कुटुंबाने कठीण निर्णय घेत इच्छामरणाचा पर्याय निवडला. सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीनंतर मंगळवार, 24 मार्च रोजी दिल्लीतील एम्स येथे हरीशने अखेरचा श्वास घेतला.

सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी

11 मार्च रोजी, सर्वोच्च न्यायालयाने हरीश राणाच्या प्रकरणात इच्छामरणाला परवानगी दिली. यानंतर, 14 मार्च रोजी त्याला गाझियाबादमधील त्याच्या घरातून दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. 16 मार्च रोजी डॉक्टरांनी त्याची फीडिंग ट्यूब काढली, जो निक्रिय इच्छामरणाचा एक भाग आहे. या प्रक्रियेमध्ये रुग्णाला जिवंत ठेवणारा बाह्य आधार काढून टाकल्यामुळे नैसर्गिक मृत्यूला वाव मिळतो.

…………

Comments are closed.