आयपीएलमध्ये बीसीसीआयच्या ‘या’ नियमाविरुद्ध बहुसंख्य कॅप्टन्स, जाणून घ्या कधी बदलणार

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या हंगामाआधी सर्व कर्णधारांची बुधवारी (२५ मार्च) मुंबईमध्ये बैठक झाली. त्यामध्ये बदलण्यात आलेल्या आणि आधीपासूनच लागू असलेल्या नियमांची चर्चा झाली. यामध्ये सर्व संघांच्या कर्णधारांबरोबरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अधिकारीही उपस्थित होते. त्यामध्ये बीसीसीआयच्या एका नियमावर बहुसंख्य कर्णधारांनी नाराजी दर्शवली आहे. आता तो नियम कोणता हे जाणून घेऊ.
बीसीसीआयने २०२४ मध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियम आणला आणि तो २०२७ च्या हंगामापर्यंत लागू राहणार असेही निश्चित केले आहे. याच नियमावर बहुसंख्य कर्णधारांनी आपला आक्षेप व्यक्त केला आहे. एका सूत्राने सांगितले की, “बहुसंख्य कर्णधारांनी इम्पॅक्ट प्लेयर नियमावर आपले मत व्यक्त केले आणि आक्षेप घेतला, मात्र बीसीसीआयने हा नियम २०२७ च्या हंगामापर्यंत वाढवला आहे. त्यांनी कर्णधारांना सांगितले की २०२७ च्या हंगामानंतर या नियमाचा आढावा घेतला जाऊ शकतो.”
इम्पॅक्ट प्लेयर नियमावर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने या काही दिवसांपूर्वीच टीका केली होती. तसेच रोहित शर्मा यानेही याआधी या नियामाला विरोध दर्शवला आहे.
अक्षर म्हणाला, “मी स्वत: एक अष्टपैलू खेळाडू असून मला हा नियम आवडत नाही. पूर्वी आम्ही या भुमिकेसाठी (फलंदाजी आणि गोलंदाजी) अष्टपैलू खेळाडूंची निवड करायचो. आता संघ व्यवस्थापक एक विशेष फलंदाजी किंवा गोलंदाजीची निवड करते. ते म्हणतात आता आम्हाला अष्टपैलू खेळाडूची काय आवश्यकता.”
रोहितनेही २०२४ मध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा चाहता नाही, त्यामुळे अष्टपैलू खेळाडूंच्या विकासात अडथळा येतो. रोहितप्रमाणे हार्दिक पांड्या आणि ग्लेन फिलिप्स यांनाही सारखेच मत व्यक्त केले होते.
मागील हंगामात बीसीसीआयने दुसऱ्या डावाच्या १० षटकानंतर चेंडू बदलण्याची परवानगी दिली होती. आता झालेल्या बैठकीत एका कर्णधाराने सुचविले की पहिल्या डावाच्या १० षटकानंतर चेंडू बदलण्याची परवानगी मिळावी. त्यावर त्या सूत्राने सांगितले, “पहिल्या डावाच्या १० षटकानंतर चेंडू बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, मात्र त्याला फारसा पाठिंबा मिळाला नाही. दुसऱ्या डावामध्ये दवाची अडचण येते त्यामुळे सध्याचा नियमच लागू राहणार आहे.”
आयपीएल २०२६ साठी काही नियम बदलले गेले असून काही तेच कायम आहेत. तसेच काही कर्णधार नवे असल्याने त्यांना मार्गदर्शक तत्वाबद्दल अधिक स्पष्टता मिळावी, म्हणून ही बैठक झाली होती.
Comments are closed.