देवगड तालुक्यात पेट्रोल टंचाई; वाहनचालक त्रस्त

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

देवगड तालुक्यातील शहरातील पेट्रोलची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. देवगड शहरात एकूण तीन पेट्रोल पंप असले तरी त्यापैकी दोन पंपावर पेट्रोलचा साठा संपला आहे. सध्या केवळ एका पंपावरच पेट्रोल उपलब्ध आहे. त्यामुळे या पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी उसळली आहे. अनेकांना दीर्घकाळ रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

पेट्रोल मिळवण्यासाठी दुचाकी व चार चाकी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. अचानक निर्माण झालेल्या या टंचाईमुळे नागरिकांमध्ये चिंता आणि संताप व्यक्त होत आहे. काही वाहनचालकांना पेट्रोल न मिळाल्याने परत जावे लागत असल्याचीही परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित पेट्रोलपंप चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नियमित प्रमाणात पेट्रोलचा कोटा मिळत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने पंपावरील साठा लवकर संपत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असल्याची चर्चा देखील नागरिकांमध्ये सुरू आहे. इराण अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याची झळ आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचत असल्याचे बोलले जात आहे पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून वाहनधारकांना रोजच्या कामकाजासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन व संबंधित विभागाने लवकरात लवकर पेट्रोलचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून केवळ आवश्यकतेनुसारच इंधन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

Comments are closed.