Israel Iran War – इराण आणि कतारमध्ये ‘सिक्रेट डील’? युद्धातून घेतला काढता पाय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आखाती देशांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि कतारमध्ये एका ‘सिक्रेट डील’ची जोरदार चर्चा सुरू आहे. इस्रायली वेबसाइट ‘JFeed’ च्या मते, इराणने कतारच्या तेल आणि वायू तळांवर हल्ले थांबवावेत, यासाठी कतारने इराणला 6 अब्ज डॉलर्स देण्याचे मान्य केले आहे. हे तेच पैसे आहेत जे 2023 मध्ये अमेरिकन कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात इराणला मिळणार होते, मात्र नंतर कतारने ते रोखले होते. आता हा निधी थेट इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प’ला दिला जाण्याची शक्यता आहे, जे सध्याच्या युद्धाचे नेतृत्व करत आहेत.

या गुप्त कराराचा परिणाम आता दिसू लागला आहे. कतारने पहिल्यांदाच अधिकृतपणे या युद्धापासून स्वतःला दूर केले आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ते आता अमेरिका आणि इराणमध्ये कोणतीही मध्यस्थी करणार नाहीत. यापूर्वी अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये वाटाघाटी घडवून आणणारा कतार आता या वादातून बाहेर पडल्याने मध्य पूर्व आशियातील काही समीकरणे बदलली आहेत. हे युद्ध त्यांचे नाही आणि ते अमेरिकेला इराणविरुद्ध कोणतीही मदत करणार नाहीत, असे कतारने स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, इराणच्या भूमिकेतही मोठा बदल दिसून आला आहे. 20 मार्चनंतर इराणने कतारवर एकही मोठा हल्ला केलेला नाही. यापूर्वी रास लफान येथील ऊर्जा तळांवर झालेल्या हल्ल्यांमुळे कतारचे मोठे नुकसान झाले होते. या हल्ल्यांमध्ये कतारच्या 4 नागरिकांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. इराणने कतारच्या एलएनजी (LNG) प्रकल्पांना लक्ष्य केल्यामुळे वायू उत्पादनात 17 टक्क्यांनी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम हिंदुस्थान आणि चीनसारख्या आयातदार देशांवर होऊ शकतो.

कतारने घेतलेल्या या भूमिकेमुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. कतारने स्पष्ट केले आहे की, हे युद्ध इस्रायलसाठी लढले जात असल्याने ते यामध्ये सहभागी होणार नाहीत. स्वतःच्या आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्राच्या संरक्षणासाठी कतारने घेतलेला हा निर्णय आखाती देशांमधील युद्धाला एक वेगळे वळण देऊ शकतो. इराणनेही सध्या शांत राहून कतारच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे, ज्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता या दोन्ही देशांच्या पुढील हालचालींवर लक्ष ठेवून आहे.

Comments are closed.