Israel Iran War – आता ट्रम्प मोठा हल्ला करणार; इराणला धमकी देत अमेरिकेने स्पष्ट केले इरादे
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाला २७ दिवस झाले आहेत. पण परिस्थिती सामान्य होण्याऐवजी, ती आणखी बिघडत चालली आहे. आता, व्हाईट हाऊसच्या एका नवीन निवेदनाने आगीत तेल ओतले असून, इराणवर मोठ्या हल्ल्याचे संकेत दिले आहेत. इराणला अमेरिकेकडून पुन्हा एकदा मोठा इशारा देण्यात आला आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता इराणचा खेळ खल्लास करणार आहेत. इराणने आखाती देशात असलेले युद्ध संपवण्यासाठी करार केला नाही, तर अमेरिका त्यावर मोठा हल्ला करू शकते. लेविट यांनी यावर जोर दिला की, ट्रम्प केवळ धमक्या देत नाहीत, तर ते प्रत्यक्षात विध्वंस घडवण्यासाठी तयार आहेत.
लेविट यांनी पत्रकार परिषदेत इराणला थेट संदेश दिला. ते म्हणाले, इराणने लष्करी कारवाईत पराभूत झाल्याचे आणि पुढेही पराभूत होत राहणार असल्याचे सत्य स्वीकारण्यास नकार दिला, तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणवर आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली हल्ला घडवून आणतील. ट्रम्प केवळ धमक्या देत नाहीत, तर ते विध्वंस घडवण्यासाठी तयार आहेत. इराणने या इशाऱ्याला हलक्यात घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेने इराणचे नौदल पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा केला आहे. लेविट यांनी याचे वर्णन दुसऱ्या महायुद्धानंतर तीन आठवड्यांत एखाद्या देशाच्या नौदलाचा सर्वात जलद विनाश करण्याचे उदाहरण असे केले. त्यांनी ऑपरेशन एपिक फ्युरीचे वर्णन एक प्रचंड लष्करी विजय असे केले.
लेविट यांनी सांगितले की, गरज पडल्यास अमेरिकी सैन्य इराणमध्ये उतरू शकते, परंतु त्यासाठी काँग्रेसच्या मंजुरीची आवश्यकता भासणार नाही, कारण अमेरिका आधीच इराणविरुद्ध एक मोठी लष्करी कारवाई करत आहे. लेविट यांनी इराणसोबतच्या वाटाघाटींबद्दल बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले की, हा एक अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि परिस्थिती सतत बदलत आहे. अमेरिकेने इराणसमोर १५-कलमी प्रस्ताव ठेवला होता. वाटाघाटी अजूनही सुरू आहेत.
हा इशारा अशा वेळी आला आहे, जेव्हा अमेरिका इराणवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हाईट हाऊसचे म्हणणे आहे की इराणने कोणताही गैरसमज बाळगू नये. ट्रम्प प्रशासनाला शांतता हवी आहे, परंतु जर इराणने नकार दिला, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
Comments are closed.