IND Vs PAK – पुन्हा एकदा हिंदुस्थानने पाकड्यांची जिरवली, दिमाखात गाठली उपांत्य फेरी
हिंदुस्थानच्या अंडर-20 फुटबॉल संघाने SAFF U-20 चॅम्पियनशिप 200 मध्ये आपल्या मोहिमेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. मालदीवची राजधानी माले येथील नॅशनल फुटबॉल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात हिंदुस्थानने पाकिस्तानचा 3-0 असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. या पराभवासोबतच पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला विशाल यादवने गोल करून टीम इंडियाला आघाडी मिळवून दिली, ज्यामुळे सुरुवातीलाच पाकिस्तानचा आत्मविश्वास डळमळीत झाला. पहिल्या सत्राचा खेळ संपेपर्यंत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर होता.
दुसऱ्या सत्रातही टीम इंडियाच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व कायम राखले. 64 व्या मिनिटाला फॉरवर्ड ओमांग डोडुमने उत्कृष्ट मैदानी गोल करत टीम इंडियाची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. दोन गोलने पिछाडीवर पडल्यानंतर पाकिस्तानी संघ दबावाखाली आला आणि त्यांच्याकडून अनेक चुका झाल्या. याचा फायदा टीम इंडियाला ८८ व्या मिनिटाला मिळाला, जेव्हा टीम इंडियाला पेनल्टी बहाल करण्यात आली. ओमांग डोडुमने या संधीचे सोने करत सामन्यातील स्वतःचा दुसरा आणि संघाचा तिसरा गोल नोंदवला. या विजयामुळे हिंदुस्थानी चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर केल्यानंतर आता टीम इंडियाचा सामना 28 मार्च रोजी बांगलादेशशी होणार आहे. त्यानंतर 1 एप्रिल रोजी संघ फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी उपांत्य फेरीचा सामना खेळेल. टीम इंडियाने आतापर्यंत चार वेळा SAFF U-20 चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. सध्याचा फॉर्म पाहता, हिंदुस्थानचा संघ पाचव्यांदा या चषकावर आपले नाव कोरण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
Comments are closed.