इराणचा सुप्रीम लीडर बनण्याची ऑफर मी नाकारली! ट्रम्प तात्यांचे आपले काहीही
अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना इराणने खंबीरपणे तोंड देत शरणागती पत्करण्यास नकार दिला. इराण झुकत नाही हे पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दररोज वाट्टेल ते बोलत सुटले आहेत. त्यांनी आता नवा दावा केला आहे. ते म्हणतात, इराणने त्यांना सर्वोच्च नेते बनण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र, मी तो नाकारला. ट्रम्प यांच्या अशा वक्तव्यांमुळे त्यांचे पार हसे झाले आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या निधी उभारणीच्या कार्यक्रमात ट्रम्प यांनी बरीच मुक्ताफळे उधळली. ते म्हणाले, इराणचा सर्वोच्च नेता बनण्यात रुची नसेल असा इतिहासात कोणत्याही देशाचा प्रमुख नसावा. आम्ही तुम्हाला आमचा पुढचा सर्वोच्च नेता बनवण्यास इच्छुक आहोत, अशी ऑफर त्यांनी दिली होती. मात्र, आम्ही म्हटले, धन्यवाद! मला हे नको.
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युद्धात अमेरिकेच्या विजयाचा दावा केला. ते म्हणाले, जगाने कधीही पाहिला नसेल एवढा मोठा विजय आम्ही प्राप्त करत आहोत. इराणच्या सरकारला युद्धबंदी हवी आहे. ते वाटाघाटी आणि चर्चा करत आहेत. मात्र, ते देशांतर्गत दबावामुळे उघडपणे बोलू शकत नाहीत.
ट्रम्प सरकारच्या कॅबिनेटमध्ये युद्धावर चर्चा
डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक घेतली. बैठकीत युद्धावर सविस्तर चर्चा झाली. इराणशी शांतता करार होण्याची शक्यता कमी आहे. युद्ध थांबवण्याची जबाबदारी इराणची आहे. आपण हल्ले करतच राहू. अण्वस्त्रसंपन्न होण्याचे प्रयत्न इराणने कायमचे सोडून द्यावेत, असे ट्रम्प म्हणाले. इराणचा तेलपुरवठा ताब्यात घेणे हा ‘एक पर्याय’ आहे. इराणमधील तोडगा व्हेनेझुएलासारखा असू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
युद्धबंदीच्या चर्चेचा दावा इराणने फेटाळला
इराणने ट्रम्प यांचे दावे खोडून काढले आहेत. अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारे युद्धबंदीबाबत चर्चा सुरू नाही. अमेरिका आणि इस्रायलविरोधात लढत राहणे हीच सध्य आमची रणनीती आहे, असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांची लोकप्रियता घटली
इराण युद्धामुळे अमेरिकेत इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे अमेरिकन नागरिक त्यांच्यावर संतापले आहेत. याचा परिणाम ट्रम्प यांच्या लोकप्रियतेवर झाला आहे. एका सर्वेक्षणानुसार ट्रम्प यांची लोकप्रियता इराण युद्धानंतर 40 टक्क्यांवरून 36 टक्क्यांवर आली आहे.
Comments are closed.