मराठेशाहीचा इतिहासकार हरपला!
'सलग पन्नास वर्षे संशोधन व लेखन करून छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते संभाजी महाराज, छत्रपती ताराराणी, राजर्षी शाहू महाराज, संताजी घोरपडे यांच्यापर्यंत इतिहासातील ज्ञात–अज्ञात पराक्रमी व्यक्तींची विस्मरणात गेलेली चरित्रे डॉ. जयसिंगराव पवार यांनी उजेडात आणली. अवघ्या मराठेशाहीलाच त्यांनी शब्दरूप दिले होते. त्यांच्या रूपाने मराठेशाहीचा इतिहासकार हरपला, अशी सार्वत्रिक भावना व्यक्त होत आहे.
जयसिंगराव पवार हे केवळ लिहून शांत बसले नाहीत. नव्या पिढीला इतिहास समजावा यासाठी ते सातत्याने व्याख्याने आणि शिबिरांना उपस्थिती लावत असत. त्यांच्या ओघवत्या शैलीत इतिहास ऐकणे ही विद्यार्थी, अभ्यासकांसाठी मोठी संधी असे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या शेकडो चाहत्यांनी साने गुरुजी वसाहत येथील निवासस्थानी गर्दी केली. खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, इतिहास संशोधक रमेश जाधव, इंद्रजित सावंत आदींनी अंत्यदर्शन घेतले. ऐतिहासिक दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे काही काळ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर पंचगंगा स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तत्त्वनिष्ठ इतिहास संशोधक – फडणवीस
‘ज्यांच्या संशोधनपूर्ण मांडणीमुळे नव्या पिढीसाठी शिव-शाहू चरित्रांचा अमूल्य असा ठेवा उपलब्ध झाला अशा डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे आपण इतिहास संशोधन क्षेत्रातील तत्त्वनिष्ठ, मार्गदर्शकाला मुकलो आहोत,’ अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
शाहू विचारांचा इतिहासकार – सुनेत्रा पवार
डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रासाठी मोठी हानी झाली आहे. मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला, अशा शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या.
इतिहासाची तटस्थ, मानवी मूल्याधारित मांडणी
डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 रोजी सांगली जिह्यातील तडसर येथे एका सामान्य कुटुंबात झाला. गरिबी व संघर्षातून त्यांनी जिद्दीने कोल्हापुरात राजाराम महाविद्यालयातून एम.ए. (सर्वोत्कृष्ट) आणि शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 1964पासून संशोधन सुरू करून मराठा इतिहासातील दुर्लक्षित पैलूंवर प्रकाश टाकला. डॉ. पवार यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे ‘महाराणी ताराबाई’ व ‘राजर्षी शाहू छत्रपती’ ही चरित्रे होत. डॉ. जयसिंगराव पवार यांनी 50हून अधिक ग्रंथ आणि 45 शोधनिबंध लिहिले असून, त्यांचे ‘सेनापती संताजी घोरपडे’, ‘मराठेशाहीचा मागोवा’ यांसारखे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत.
Comments are closed.