रक्ताच्या थेंबांतून रंगला मानवतेचा सुपरहिट सामना
शिवडीच्या मातीला रविवारी एक वेगळाच रंग चढला होता. सामाजिक बांधिलकी जपणाऱया साईराज मित्र मंडळाने साईराज प्रीमियर लीगच्या निमित्ताने खेळाडूंनी फटकेबाजी करण्याआधी रक्तदानाचा अनोखा पॉवर प्ले खेळत मानवतेचा सुपरहिट सामना रंगवला.
गेली सहा वर्षे साईराज प्रीमियर लीगच्या माध्यमातून समाजासमोर खेळातून रक्तदानाचे सत्कार्य करत आहेत. येत्या 23 ते 26 एप्रिलला शिवडीच्या साईराज पटांगणात रंगणार्या या लीगमध्ये जो संघ सर्वाधिक रक्तदान करील त्याच संघाला सर्वप्रथम संधी देण्याचा माणुसकीचा नवा फंडा आखला. त्यामुळे ही लीग नव्हती, तर प्रत्येक धाव, प्रत्येक चेंडू कोणाच्या तरी श्वासाशी आपसूकच जोडली गेली. मैदानावर उतरण्याआधीच 461 खेळाडूंनी आपले ‘रक्त’ दिले आणि त्यातून उभा राहिला लीगमध्ये खेळणारा संघ. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एका संघातून किमान 15 खेळाडूंना रक्तदान करणे बंधनकारक होते. त्यामुळे या क्रिकेट लीगच्या निमित्ताने 20 संघांच्या खेळाडूंनी रक्तदान केले आणि त्यांच्या या निर्णयातून 1383 रुग्णांना जीवनदान लाभले.
या स्पर्धेचा अनोख्या नियमामुळे इथे प्रत्येक खेळाडू आधी ‘रक्तदाता’ आणि नंतर ‘क्रिकेटपटू’ ठरतो. त्यामुळे ही लीग मानवतेची ठरली. या लीगमध्ये रक्तदान करून जीवनदानाचे सत्कार्य करण्याचे ध्येय बाळगले जात असल्यामुळे वर्षागणिक रक्तदात्यांचा स्कोअर वाढतच जातोय. गेल्या वर्षी 319 रक्तदाते उतरले होते, तर यंदा हा आकडा 461 वर पोहोचला. प्रभात क्रीडा मंडळाच्या तर 33 खेळाडूंनी रक्तदान करत बाजी मारली. सहा वर्षांची अनोखी परंपरा जपत साईराज मित्र मंडळाने ट्रॉफी जिंकणं मोठं नाही तर कुणाच्या जीवनदानासाठी रक्ताचा थेंब दान करणं हेच खरं विजेतेपद होय, असा नवा आदर्श समाजासमोर उभा केला. या अनोख्या सामाजिक लीगला शिवसेना सचिव सुधीर साळवी, आमदार अजय चौधरी, नगरसेवक सचिन पडवळ, नगरसेविका सुप्रिया दळवी, युवासेना सदस्य पवन जाधव तसेच मंडळाचे अध्यक्ष संभाजी मोरे, सचिव गणेश कोरे, दीपक भारद्वाज, सम्राट चव्हाण यांची उपस्थिती लाभली. केईएम, जे. जे. महानगर आणि मीनाताई ठाकरे रक्तपेढींनी हा उपक्रम यशस्वी केला.
Comments are closed.