रिक्षांच्या लायसन्स, बॅचसाठी जन्मतारखेचे बनावट दाखले; मीरा-भाईंदर पालिकेतील धक्कादायक प्रकार, माहिती अधिकारात झाला भंडाफोड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रिक्षांचे बॅच व लायसन्स मिळवण्यासाठी जन्मतारखेचे बनावट दाखले दिल्याचा धक्कादायक प्रकार मीरा-भाईंदर महानगरपालिकेत घडला आहे. सहा रिक्षाचालकांना २६७६ या एकाच रजिस्ट्रेशन नंबरचे दाखले महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागामार्फत दिले असून माहिती अधिकारांतर्गत त्याचा भंडाफोड झाला आहे. जन्मतारखेचे बनावट दाखले देणारे मोठे रॅकेट पालिकेत असल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.

रिक्षांचे लायसन्स, बॅच तसेच परमिट मिळवण्यासाठी १५ वर्षे अधिवासाचा पुरावा (डोमिसाईल) आवश्यक असतो. मीरा-भाईंदरमधील काही रिक्षाचालकांनी डोमिसाईल मिळवण्यासाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. डोमिसाईल प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी जन्मतारखेचे जे दाखले कागदपत्रांसोबत जोडले होते ते बनावट असल्याचे आढळून आले. शादाब, फहिम खान, नायाज मणियार, नबी शान, मुकेश सिंग, मोहम्मद जुनेद या सहा जणांनी सादर केलेल्या जन्म दाखल्यांमध्ये २६७६ या एकाच क्रमांकाचा उल्लेख असल्याचे दिसून आले.

माहिती अधिकार कार्यकर्ते नीलेश फापाळे यांनी बोगस जन्म दाखल्यांचा घोटाळा बाहेर काढला आहे. विशेष म्हणजे मीरा-भाईंदर महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील उपनिबंधकांनी फापाळे यांना पत्र पाठवून सहाही रिक्षाचालकांनी जोडलेली जन्मतारखेची प्रमाणपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. जन्म दाखल्यांच्या छायांकित प्रती व मूळ जन्म अभिलेखावरील नोंदणी क्रमांक तपासले असता ते एकाच क्रमांकाचे असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे क्रमांक एकच कोणी लिहिले, त्यामागे मोठे रॅकेट आहे काय, असाही संशय निर्माण झाला आहे.

तहसील कार्यालयाने पडताळणी का केली नाही?
रिक्षांचे परमिट, लायसन्स व बॅच मिळवण्यासाठी डोमिसाईल बरोबरच शिधापत्रिका, विजेचे बिल ही कागदपत्रेदेखील द्यावी लागतात. त्यात जन्मतारखेचा दाखला हा अतिशय महत्त्वाचा असूनही तहसीलदार कार्यालयातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याची पडताळणी का केली नाही, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते नीलेश फापाळे यांनी केला आहे.

Comments are closed.