Israel Iran War – होर्मुझच्या वेढ्यातून सुटका! 23 दिवसांनंतर ‘जग वसंत’ जहाज गुजरातमध्ये दाखल
आखाती देशातील युद्धामुळे ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’त अडकलेले हिंदुस्थानचे ‘जग वसंत’ हे नैसर्गिक वायूची वाहतूक करणारे जहाज अखेर गुरुवारी रात्री उशिरा गुजरातच्या वाडिनार बंदरात सुखरूप पोहोचले. तब्बल 23 दिवस हे जहाज होर्मुझ सामुद्रधुनीच्या या धोकादायक सागरी मार्गात अडकून पडले होते. 47,600 मेट्रिक टन एलपीजी गॅस घेऊन आलेले हे जहाज हिंदुस्थानसाठी महत्वाचे मानले जात आहे. याचसोबत ‘पाइन गॅस’ नावाचे दुसरे जहाजही लवकरच मंगळुरू बंदरात पोहोचणार असून या जहाजांवरील सर्व 60 हिंदुस्थानी खलाशी पूर्णपणे सुरक्षित आहेत.
या दोन जहाजांमुळे हिंदुस्थानच्या गॅस साठ्यात साधारण 92,000 मेट्रिक टन एलपीजीची भर पडणार आहे. हे प्रमाण देशाच्या एका दिवसाच्या गॅस वापराएवढे आहे. गेल्या 10 दिवसांत अशाच प्रकारे दोन मोठे टँकर या धोकादायक मार्गातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले आहेत. ‘जग वसंत’च्या आधी ‘शिवालिक’, ‘नंदा देवी’ आणि ‘एमटी अपोलो ओशन’ ही जहाजेदेखील मोठ्या प्रमाणात गॅस घेऊन हिंदुस्थानी बंदरांवर दाखल झाली आहेत, ज्यामुळे गॅस टंचाईची भीती काहीशी कमी झाली आहे.
जहाज वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या हिंदुस्थानची 20 जहाजे अद्यापही होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेली आहेत. यामध्ये 5 मोठ्या गॅस टँकर्सचा समावेश असून त्यांच्याकडे सुमारे 2,30,000 मेट्रिक टन एलपीजीचा साठा आहे. ही जहाजे हिंदुस्थानात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. हिंदुस्थानला आपल्या गरजेचा 60 टक्के एलपीजी परदेशातून आयात करावा लागतो आणि त्यातील 90 टक्के पुरवठा याच सागरी मार्गावरून होत असल्याने या मार्गाचे महत्त्व हिंदुस्थानसाठी अनन्यसाधारण आहे.
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे; मात्र अद्याप कोठेही पुरवठा खंडित झालेला नाही, असे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. गॅस वितरकांकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विसंबून राहावे, असे आवाहन सरकारने केले आहे. घाबरून जाऊन गॅसची अतिरिक्त साठेबाजी करू नका, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
देशात इंधनाचा तुटवडा असल्याचे वृत्त सरकारने फेटाळून लावले असून हा जाणीवपूर्वक पसरवलेला चुकीचा प्रचार असल्याचे म्हटले आहे. हिंदुस्थानकडे सध्या 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा आणि 30 दिवसांचा घरगुती गॅसचा साठा (LPG Cover) उपलब्ध आहे. त्यामुळे सध्यातरी गॅसची कमतरता भासणार नाही, अशी माहिती केंद्राने दिली आहे. तसेच, पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यासाठी सरकार नवीन देशांशी करार करून आयातीचे मार्ग बदलण्यावरही काम करत आहे.
Comments are closed.