अमेरिकन सैनिकांना आश्रय दिल्यास खबरदार! इराणचा आखाती देशांना इशारा
मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) हॉटेल मालकांना कठोर इशारा दिला आहे. अमेरिकन लष्करी कर्मचाऱ्यांना आश्रय दिल्यास संबंधित हॉटेल्सवर हल्ले करू असा इशारा इराणने दिला आहे.
इराणी क्षेपणास्त्र हल्ले आणि सहकारी दहशतवादी गटांसोबतच्या संयुक्त कारवायांनंतर अमेरिकन सैन्याने मध्यपूर्वेतील विविध हॉटेल्समध्ये आश्रय घेतला आहे. अमेरिकेच्या लष्करी पायाभूत सुविधांवर (military infrastructure) हल्ले झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
कोणत्याही हॉटेल किंवा इमारतीत परदेशी लष्करी कर्मचारी राहत असल्यास तो इशारा तत्काळ लागू होईल. ही कारवाई लगेच प्रभावी होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अहवालात असेही म्हटले आहे की, अमेरिकन सैन्याने नागरी ठिकाणी (civilian sites) आपली उपस्थिती वाढवली आहे. यात बेरुतच्या जुन्या विमानतळाजवळील लॉजिस्टिक बेस, दमास्कस येथील रिपब्लिक पॅलेस, तसेच Four Seasons आणि Sheraton हॉटेल्समध्ये सल्लागार (advisory) ऑपरेशन्सचा समावेश आहे. तसेच, अमेरिकन मरीन सैनिकांना इस्तानबूल आणि सोफिया मार्गे जिबूती आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री सईद अब्बास अराघची यांनी गुरुवारी आखाती देशांतील हॉटेल्सना अमेरिकन सैनिकांना प्रवेश न देण्याचे आवाहन केले. त्यांनी आरोप केला की, अमेरिकन सैनिक युद्ध सुरू झाल्यापासून GCC (Gulf Cooperation Council) देशांतील लष्करी तळ सोडून हॉटेल्स आणि कार्यालयांमध्ये लपले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी लिहिले की, “अमेरिकन सैनिक नागरिकांना मानवी ढाल म्हणून वापरत आहेत.” त्यांनी अमेरिकेतील हॉटेल्सचे उदाहरण देत सांगितले की, संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांना तिथे राहण्याची परवानगी दिली जात नाही, तसेच धोरण गल्फ देशांनीही अवलंबावे.
यापूर्वी, 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे तेहरान आणि इतर इराणी शहरांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि काही नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या हल्ल्यांनंतर इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करत प्रत्युत्तर दिले. तसेच, होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण अधिक कडक करत इस्रायल आणि अमेरिकेशी संबंधित जहाजांना अडवण्याची कारवाईही केली आहे. मध्यपूर्वेतील ही वाढती चकमक आणि इराणचा इशारा यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली असून जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments are closed.