प्रियकराने मैत्रिणीच्या केसांचे कौतुक केले अन् संतापलेल्या प्रेयसीने तरूणीचे केसचं कापले, मुंबईतील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या प्रियकराने दुसऱ्या एका तरुणीच्या लांबसडक केसांचे कौतुक केल्याचे सहन न झाल्याने, एका 21 वर्षीय तरुणीने आपल्या मैत्रिणींसह थेट त्या मुलीच्या घरात घुसून तिचे केस कापले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील केला. या अजब कृत्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी आरोपी तरुणीसह तिच्या तीन मैत्रिणींवर 26 मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुणी आणि तिचा प्रियकर यांची मैत्री होती. काही काळापूर्वीच त्यांची ओळख झाली होती. आरोपी तरूणीचा प्रियकर आणि पीडित तरूणी हे दोघे सोशल मीडियावर एकमेकांच्या संपर्कात होते. यावेळी बोलताना आरोपी तरुणीच्या प्रियकराने पीडित तरुणीच्या सुंदर केसांची प्रशंसा केली होती. हे समजल्यानंतर प्रेयसीच्या मनात प्रचंड इर्ष्या निर्माण झाली. आपल्या सौंदर्यापेक्षा दुसऱ्या कोणाचे कौतुक आपल्या प्रियकराने करावे, ही गोष्ट तिला इतकी खटकली की तिने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले.

घटनेच्या दिवशी आरोपी तरुणी आपल्या काही मैत्रिणींना घेऊन पीडित मुलीच्या घरात शिरली. तिथे त्यांनी आधी शाब्दिक वाद घातला आणि त्यानंतर पीडितेवर हल्ला केला. आरडाओरडा सुरू असतानाच आरोपी तरुणीने कात्री काढून पीडित तरुणीचे केस कापून टाकले. इतकेच नाही तर तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही दिली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पीडित तरुणी प्रचंड दहशतीत आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून, संबंधित तरुणींची चौकशी केली जात आहे. केवळ केसांच्या कौतुकावरून अशा प्रकारे घरात घुसून हल्ला करण्याच्या या घटनेची सध्या सोशल मीडियावर आणि मुंबईत जोरदार चर्चा रंगली आहे.

Comments are closed.