Ayurveda: आयुर्वेदानुसार गोड पूर्णपणे बंद करणेही घातक; मग ते कधी खावे?
आजकाल ‘नो शुगर’ आणि ‘लो सोडियम’ आहाराचा ट्रेंड वाढला आहे. पण खरे तर साखर आणि मीठ दोन्ही शरीरासाठी आवश्यक असते. फक्त हे दोन्ही घटक संतुलित प्रमाणात आहारात घेणे गरजेचे आहे. बहुतांश फिटनेस फ्रीक लोकं गोड खाणे पूर्णपणे बंद करतात. पण आयुर्वेदानुसार शरीराचा समतोल आणि ऊर्जेसाठी मर्यादित प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन करणे आवश्यक असते. गोड नेमके कधी खावे याबाबतही आयुर्वेदात सांगण्यात आले आहे. ( right time for eating sweets according to ayurveda )
कोणतेही अन्न हे योग्य वेळी घेतल्यास आरोग्याचे नुकसान होत नाही. आयुर्वेदात अन्नापासून ते पाणी पिण्याची एक वेळ सांगण्यात आली आहे. जेव्हा सर्व काही या वेळेनुसार केले जाते तेव्हा संपूर्ण शरीर संतुलित राहते. त्याचप्रमाणे गोड पदार्थ वेळेवर आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते, मन प्रसन्न राहते आणि पचनक्रिया सुधारते. पण जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या वेळी गोड खाल्ल्याने लठ्ठपणा, आळस आणि इतर अनेक आजारांचा धोका वाढतो.
बहुतांश जणांना जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होते, पण आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणापूर्वी खाल्ले पाहिजेत. जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही घरी बनवलेला शिरा किंवा गूळ- चणे किंवा खजुरापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता. याव्यतिरिक्त तुम्ही नैसर्गिकरित्या गोड असलेली फळे देखील खाऊ शकता. गोड खाण्याची इच्छा झाल्यावर आईस्क्रीम किंवा डबाबंद गोड पदार्थ खाणे टाळा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते. तसेच जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते आणि अपचन, गॅस, पित्ताचे त्रास होऊ शकतात.
लक्षात ठेवा नैसर्गिकरित्या गोड असलेली फळे आणि घरी बनवलेल्या गोड पदार्थांचे सेवन तुम्ही करू शकता. पण हे पदार्थही मर्यादित प्रमाणात खाणे गरजेचे आहे. गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे वजन वाढणे, शरीरावर सूज, मधुमेह, आळस आणि कफ-संबंधित समस्या उद्भवू शकतात.
Comments are closed.