IPL 2026 – 12 भाषांमध्ये 160 हून अधिक समालोचकांचा आवाज; मराठी पॅनेलमध्ये दिग्गज खेळाडूंचा भरणा
IPL 2026 चा थरार उद्या (28 मार्च) पासून सुरू होत आहे. या महाकुंभाच्या पूर्वसंध्येला अधिकृत ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने समालोचकांच्या नावांची घोषणा केली आहे. यंदा तब्बल 12 भाषांमध्ये 160 हून अधिक अनुभवी समालोचक चाहत्यांचे मनोरंजन करणार आहेत. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिशसह, भोजपुरी, हरयाणवी आणि तमिळ यांसारख्या प्रादेशिक भाषांचा समावेश असून, चाहत्यांना त्यांच्या आवडत्या भाषेत सामन्याचा आनंद घेता येईल.
यंदाच्या हंगामात सर्वात मोठे आकर्षण म्हणजे टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू आर. अश्विन आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव यांची कॉमेंट्री बॉक्समधील नवी इनिंग. अश्विनने 2025 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व केल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, आता तो प्रेक्षकांना खेळाचे बारकावे समजावून सांगताना दिसेल. अश्विन आणि उमेशसोबतच हिंदीमध्ये नवजोत सिंह सिद्धू, आकाश चोप्रा आणि इरफान पठाण तर इंग्लिशमध्ये रवी शास्त्री, एबी डिविलियर्स आणि डेल स्टेन यांसारखे जागतिक स्टार्स आपली मते मांडतील.
मराठी भाषिक प्रेक्षकांसाठी देखील एक तगडा ताफा सज्ज झाला आहे. मराठी समालोचनाची धुरा किरण मोरे, सलील अंकोला, धवल कुलकर्णी आणि प्रवीण तांबे यांसारख्या अनुभवी माजी खेळाडूंवर असेल. त्यांना आदित्य तरे, प्रसन्न संत, चैतन्य संत, गणेश जोशी आणि प्रसाद क्षीरसागर यांची साथ लाभणार आहे. मैदानातील चौकार-षटकारांसोबतच अस्सल मराठी भाषेतील ही मेजवानी आयपीएलचा आनंद अधिकच वाढवणार आहे.
Comments are closed.