केसरकरांची वेदना; खरातला 39 आमदार भेटून गेले, मग माझेच नाव का घेता?
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातशी जवळीक असणाऱ्या राजकीय नेत्यांच्या चौकशीची मागणी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री दीपक केसरकर यांनी भोंदू खरातला तब्बल 39 आमदार भेटून गेले, मग माझेच नाव का घेतले जाते, असा संताप व्यक्त केला आहे.
मी देवभक्त आहे. मी न चुकता शिर्डीला येतो. ते जे ईशान्येश्वर मंदिर आहे, ते शिर्डीच्या रस्त्यात आहे. मी लहान असल्यापासून दर सोमवारी दर्शनासाठी शिव मंदिरात जातो. शिर्डीला आल्यानंतर कोणत्या महादेव मंदिरात जायचे? तर मग ईशान्येश्वर मंदिरात जाणे झाले. मी फक्त एकदाच ईशान्येश्वर मदिरात पूजा केली. त्या निमित्ताने अशोक खरातशी ओळख झाली. जवळपास 39 आमदार भेटून गेले. मग माझेच नाव का घेतले जाते. त्याची ओळख झाली म्हणजे त्याच्या कोणत्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असे नाहा. त्याच्याकडून जे चुकीचे कृत्य घडले आहे, त्यासाठी त्याला शिक्षा झाली पाहिजे, असे केसरकर म्हणाले.
खरातच्या भोंदूपणाची कल्पना नाही
मी मंत्री असतानाही येथे येत होतो तेच दुर्दैव आहे. पण तेव्हा माझ्यासोबत पोलीसही असायचे. त्यांनाही या गोष्टीची कल्पना नव्हती. खरातच्या काही भक्तांमध्ये अनेक शिक्षक होते. त्यांच्यासाठी मी खूप काम केले आहे. ते नेहमी मला सांगायचे की, तुम्ही शिक्षणासाठी जेवढे काम केले, तेवढे कोणत्याही शिक्षण मंत्र्यांनी केले नाही. त्यांना या गोष्टीची कल्पना असती तर त्यांनीही मला सावध केले असते, असे केसरकर म्हणाले.
मुख्यमंत्रीही येऊन गेले
खरातच्या अघोरी कृत्याची मला कल्पना नाही. ईशान्येश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. त्यामुळेच मी तिथे गेलो. मुख्यमंत्रीही स्वतः येऊन गेले. अनेक मंत्री येऊन गेले, असा दावा त्यांनी केला.
बावनकुळे म्हणतात… खरातचे संबंध महसूल अधिकाऱ्यांशी
भोंदूबाबा अशोक खरातच्या चौकशीतून धक्कादायक माहिती पुढे येत आहे. त्यातच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांशी अशोक खरातचे संबंध असल्याचा गौप्यस्पह्ट केला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावरील ट्विट्सच्या आधारे याबाबत चौकशी सुरू असून पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.