पंतप्रधान मोदींनी प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक केले
अयोध्येत ‘सूर्यतिलक’ समारंभ उत्साहात साजरा
वृत्तसंस्था / अयोध्या
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील भव्य राम मंदिरात ‘सूर्यतिलक’ समारंभ अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा या समारंभात भक्तीभावाने समाविष्ट झाले आहेत. त्यांनी प्रभू श्रीरामाच्या चरणी लीन होऊन प्रार्थना केली. या सोहळ्याला 10 लक्षांहून अधिक रामभक्तांची उपस्थिती लाभली आहे. अनेक मान्यवरही या निमित्त अयोध्येला आलेले आहेत. शुक्रवारी हा समारोह साजरा करण्यात आला. प्रभू श्रीरामचंद्रांच्या ललाटावर शुक्रवारी सूर्योदय प्रसंगी सूर्याचे किरण पडल्याचे अद्भूत दृष्य सर्व उपस्थितांनी अनुभवले. साधारणत: 9 मिनिटे श्रीरामचंद्रांचे ललाट सूर्यकिरणांनी तेजाळले. म्हणूनच या समारंभाला ‘सूर्यतिलक’ सभारंभ अशी संज्ञा आहे. प्रत्येक वर्षी हा समारंभ साजरा केला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमानिमित्त, ‘एक्स’ वरुन संदेश दिला आहे. त्यांनी रामनवमीनिमित्त देशातील सर्व नागरीकांना शुभेच्छा दिल्या. उत्तर भारतात रामनवमीचा उत्सव शुक्रवारी साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात मात्र, तो गुरुवारी साजरा करण्यात आला आहे. ‘प्रभू श्रीरामचंद्र ज्या दिवशी जन्माला आले, तो हा रामनवमीचा दिवस आपल्याला नवी संवेदना आणि नवा उन्मेष देवो. तसेच आपल्या सर्वांमध्ये बलशाली भारताच्या निर्मितीसाठी अखंड ऊर्जेचा संचार होवो,’ अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी संदेशात स्पष्ट केले.
धर्म, न्याय आणि कर्तव्याचा संदेश
रामनवमीचा दिवस आपल्या सर्वांना धर्म, न्याय आणि कर्तव्यासाठी आयुष्य व्यतीत करण्याचा संदेश देतो. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाने आपल्या सर्वांसमोर त्याग, निष्ठा, एकात्मता आणि पराक्रम यांचा अत्युच्च आदर्श ठेवला आहे. आज आपण प्रभू रामचंद्रांच्याच ‘रामराज्य’ नामक ‘उत्तम प्रशासना’ची संकल्पना स्वीकारली आहे. आजच्या या पवित्र दिनी आपण सर्वांनी त्यांचा हाच आदर्श आचरणात आणण्याची आणि भारताला समर्थ राष्ट्र बनविण्याची प्रतिज्ञा करावी, असे मी आवाहन करतो, अशी स्फूर्तीदायी प्रेरणा त्यांनी संदेशात दिली आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांचाही शुभसंदेश
रामनवमीच्या निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘या पवित्र दिनी, मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देते आणि त्यांना सुयश चिंतीते, अशा भावोत्कट शब्दांमध्ये त्यांनी आपला संदेश दिला. उत्तर भारतात शुक्रवारी सर्वत्रच रामनवमीचा सोहळा अमर्याद भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
कडक सुरक्षा व्यवस्था
रामनवमीच्या प्रसंगी सर्वत्र प्रशासनांनी कठोर सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. पोलीस आणि सुरक्षा रक्षकांप्रमाणेच ड्रोन्समधून देखरेख ठेवली गेली. कोठेही कोणताहवी अनुचित प्रसंग न घडता हा सण साजरा करण्यात आल्याचे दिसून आले. विशेषत: उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड आदी राज्यांमध्ये राममंदिरे रामभक्तांनी गजबजली होती.
पश्चिम बंगालमध्ये अपूर्व उत्साह
पश्चिम बंगालमध्येही रामनवमीचा सण प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला आहे. शुक्रवारी राज्यात सहस्रावधी मिरवणुका काढण्यात आल्या. कोलकाता, हावडा आणि इतर महत्वाच्या स्थानी अनेक मिरवणुका निघाल्या. अनेक हिंदू संघटनांनी या मिरवणुकांचे विशेष आयोजन केले होते. या मिरवणुकांमध्ये या संघटनांच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच लक्षावधी सर्वसामान्य नागरीकही समाविष्ट झाल्याचे दिसून आले. एप्रिलमध्ये या राज्यात अन्य तीन राज्ये आणि एका केंदशासित प्रदेशासह विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे या वर्षीच्या रामनवमीला या राज्यात एका राजकीय परिणाम लाभल्याचेही पहावयास मिळत होते. भारतीय जनता पक्षाच्या अनेक राज्यस्तरीय नेत्यांनी या मिरवणुकांमध्ये भाग घेतल्याचे दिसून आले.
रामनवमी सोहळा अपूर्व उत्साहात
ड उत्तर भारतात रामनवमी सोहळा अपूर्व उत्साह आणि जल्लोशात साजरा
ड अयोध्येत ‘सूर्यतिलक’ सोहळा पाहण्यासाठी 10 लक्ष भाविकांची उपस्थिती
ड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्व देशवासीयांना संदेश
ड पश्चिम बंगालमध्येही रामनवमीच्या सोहळ्यात लक्षावधी नागरीकांचा सहभाग
Comments are closed.