जुन्नर आंबेगावचे प्रांतअधिकारी एसीबीच्या जाळ्यात, दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक
नारायणगाव येथील एका इमारतीला ‘अंशत: पूर्णत्व दाखला’ देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना जुन्नर-आंबेगावचे प्रांत अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा महसूल विभागाची खाबूगिरी चव्हाटय़ावर आली आहे.
गोविंद शिंदे (46) असे लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्या भागीदारी फर्मने पुणे-नाशिक महामार्गालगत उभारलेल्या इमारतीचे 90 टक्के काम पूर्ण झाले होते. या इमारतीचा कायदेशीर दाखला मिळवण्यासाठी त्यांनी प्रस्ताव सादर केला होता. नगररचना विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळूनही शिंदे यांनी हा प्रस्ताव स्वतःकडे प्रलंबित ठेवला होता. 20 मार्च रोजी तक्रारदार या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी गेले असता शिंदे यांनी 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यावर तक्रारदाराने 24 मार्च रोजी पुणे ‘एसीबी’कडे धाव घेऊन तक्रार नोंदवली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज या तक्रारीची शहनिशा केली. पडताळणी दरम्यान शिंदे यांनी तडजोडीअंती 2 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार दुपारी तीन वाजता महसूल विभागाच्या कार्यालयातच सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून 2 लाख रुपयांची रोकड स्वीकारताच पथकाने शिंदे यांना ताब्यात घेतले.
क्लास वनचे अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकल्याने पुणे जिल्हा महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणार यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
Comments are closed.