संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘वनराणी’ला ब्रेक, ट्रॅकमध्ये तांत्रिक बिघाड, इंजिनची क्षमता अपुरी
पर्यटकांचे आकर्षण असलेली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘वनराणी’ या मिनी ट्रेनला ब्रेक लागला आहे. ही ट्रेन सुरू होऊन दोन आठवडे झाले नाही तेच ट्रॅकमधील तांत्रिक बिघाडामुळे वनराणी काही काळासाठी बंद करावी लागली. परंतु लवकरच वनराणी पुन्हा धावू लागेल असे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वनराणी ही मिनी ट्रेन 14 मार्चपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पूर्ण क्षमतेने पर्यटकांसाठी कार्यान्वित करण्यात आली. ट्रेनची सफर तेव्हापासून सुरळीत होत असताना 23 तारखेच्या संध्याकाळी ट्रॅकमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याचे अधिकाऱयांच्या निदर्शनास आले. याची तत्काळ दखल घेत ट्रक संबंधित उद्भवलेला तांत्रिक बिघाड दूर करेपर्यंत ट्रेन तोपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण तयारीत ट्रेन सुरू केल्यानंतर अल्पवधीतच ट्रकच्या तांत्रिक बिघाडामुळे ट्रेनची सफर तात्पुरती बंद केल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
ट्रॅकचा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याबरोबर इंजिनची क्षमता अतिरिक्त दोन पॉवर्स मोटर्सने वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले. या सर्व अडचणी दूर झाल्यानंतर लवकरच वनराणी पुन्हा पर्यटकांच्या सेवेत हजर होईल, असे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Comments are closed.