रमाधाममध्ये घुमला विठूनामाचा गजर, रामनवमीच्या पावन पर्वावर विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची प्रतिष्ठापना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसैनिकांच्या वात्सल्यमूर्ती माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या प्रेरणेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खोपोली येथे उभारलेल्या रमाधाम वृद्धाश्रमात आज विठूनामाचा गजर घुमला. श्रीरामनवमीच्या पावन पर्वावर रमाधाम वृद्धाश्रमातील मंदिरात आज विठ्ठल-रखुमाई मातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य आणि प्रख्यात वास्तुविशारद डॉ. दयानंद राव यांच्या हस्ते या मूर्तींचे पूजन करण्यात आले. या वेळी रमाधाममधील आजी-आजोबांनी गायलेल्या भक्तिगीतांमधून विठूनामाचा गजर घुमला.

रमाधाम म्हणजे आजी-आजोबांच्या हक्काचे घरच. वानप्रस्थाश्रमासाठी येथे आलेल्या आजी-आजोबांना भक्ती आणि अध्यात्माचा आनंद मिळावा यासाठी काही महिन्यांपूर्वी रमाधामच्या प्रांगणात श्रीगणेशाचे मंदिर उभारण्यात आले. आज श्रीरामनवमीचे पावन पर्व साधत या मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी भजन-कीर्तनात आजी-आजोबा तल्लीन झाले होते. या वेळी रामजन्मोत्सवही साजरा करण्यात आला. अनेक आजी-आजोबांनी विठ्ठल नामाची गीते गायली. राम जन्मला गं सखे राम जन्मला या गीतरामायणातील गाण्याने रमाधामचा परिसर भक्तिमय झाला होता. रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी आजी-आजोबांना रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या. या वेळी सामाजिक कार्यकर्ते अनुरुद्र नारकर, विनोद सैद यांच्यासह रमाधामचे कर्मचारी व आजी-आजोबा मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.