बांग्लादेशचे डोके आले ठिकाणावर! आयपीएल 2026 बाबत घेतला महत्वाचा निर्णय

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे सामन्याच्या प्रसारणाबाबत बांग्लादेशने आपल्या भुमिकेत महत्वपूर्ण बदल केला आहे. नवनियुक्त माहिती आणि प्रसारण मंत्री झहीर उद्दीन स्वपन यांनी देशात या स्पर्धेच्या प्रसारणावरील कोणतेही बंधन नाही, हे स्पष्ट केले आहे.

याआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) घोषणा केली होती की, ते आयपीएलचे कोणतेही प्रसारणाधिकार घेणार नाहीत आणि या स्पर्धेचे बांगलादेशात कुठेही प्रसारण केले जाणार नाही. आता मात्र त्यांनी आपली भूमिका बदलली असून, भारताशी चांगले संबंध कायम राखायचे असल्याने त्यांनी देशात आयपीएल सामन्यांचे प्रसारण करायचे निश्चित केले आहे.
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या बंदीमुळे आयपीएल प्रसारणाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. त्यामुळे जे चॅनेल्स स्पर्धेचे प्रसारण करत होते, ते थांबवण्यात आले होते.

“आयपीएल प्रक्षेपण करण्यासाठी आमच्याकडे कोणीही अर्ज केलेला नाही. आम्हाला खेळासोबत राजकारण मिसळायचे नाही. आम्ही याकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहू आणि जर कोणताही चॅनेल हे प्रसारण करू इच्छित आहे, तर त्यावर आम्ही सकारात्मक विचार करू,” असे स्वपन यांनी सांगितले आहे.

बांग्लादेशमधील केबल ऑपरेटर्सनीदेखील याचा पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनाही आयपीएलच्या सामन्यांचे प्रक्षेपण थांबवण्याचे कोणतेही निर्देश आलेले नाही, असे सांगितले आहे. त्यांचे सचिव रेझाउल करीम लब्लू म्हणाले, “आम्ही कोणालाही स्पर्धेचे प्रक्षेपण करण्यापासून रोखणार नाही. जर स्टार स्पोर्ट्सने बांग्लादेशमध्ये आयपीएलचे प्रसारण केले तर त्यांनी आमची मान्यता आहे. त्यावर कोणतीही सक्ती आणली जाणार नाही. जर सरकारने थांबावायला सांगितले तर ते आम्ही करू, मात्र सध्यातरी तसे काही निर्देश आलेले नाहीत.”

भारत आणि बांग्लादेश यांच्यात राजकिय तणावामुळे क्रिकेटचे संबंध बिघडले होते. त्यामुळेच कोलकाता नाईट रायडर्सने बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार करारबद्ध केलेल्या मुस्तफिजुर रहमानचा करार रद्द केला होता.

Comments are closed.