भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरुद्ध दोन नवीन FIR, आतापर्यंत 10 गुन्हे दाखल
भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली आहे. शुक्रवारी रात्री खरात याच्याविरुद्ध आणखी दोन नवीन गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. यामुळे आतापर्यंत त्याच्यावर दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांची संख्या १० वर पोहोचली आहे. या प्रकरणाच्या तपासात आता केवळ लैंगिक शोषण आणि फसवणूकच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय हवाला रॅकेटचे धागेदोरेही समोर येत असल्याने खळबळ माजली आहे.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दोन नवीन गुन्ह्यांपैकी एक गुन्हा एका महिलेच्या लैंगिक शोषणाशी संबंधित आहे, तर दुसरा गुन्हा आर्थिक फसवणुकीचा आहे. नेवासा येथील एका व्यापाऱ्याने तक्रार दिली आहे की, व्यवसायात वृद्धी करण्याचे आमिष दाखवून खरातने त्यांना लाखो रुपयांच्या अंगठ्या विकून त्यांची फसवणूक केली. दुसरीकडे पतीसोबतच्या वादावर तोडगा काढण्यासाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा खरातने विनयभंग व लैंगिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे की, अशोक खरात हा केवळ भोंदूगिरीच करत नव्हता, तर तो मोठ्या प्रमाणावर हवाला रॅकेटही चालवत होता. या रॅकेटचे जाळे दुबईपर्यंत पसरल्याचे संकेत मिळाले आहेत. या व्यवहारात काही प्रभावशाली व्यक्ती आणि बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष तपास पथकाला (SIT) यासंदर्भात महत्त्वपूर्ण पुरावे हाती लागले असून, तपासाची व्याप्ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढण्याची शक्यता वारवाली जात आहे.
Comments are closed.