आयपीएल 2026 पूर्वी मिचेल स्टार्कचा मोठा खुलासा, दुखापतीवर बोलताना ट्रोलर्सना दिलं कडक उत्तर
आयपीएल 2026 च्या 19व्या हंगामाची सुरुवात 28 मार्चपासून होत असून उद्घाटनाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. यंदाच्या हंगामातही ऑस्ट्रेलियाचे अनेक दिग्गज खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याचाही समावेश आहे. मात्र, स्टार्क अजूनही संघासोबत जोडले गेले नसल्याने विविध चर्चांना उधाण आले होते.
या पार्श्वभूमीवर स्टार्कने सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली. “मी सध्या पुनर्वसन प्रक्रियेत आहे आणि माझ्या खांद्याला व कोपराला दुखापत झाली आहे. मात्र, माझ्याबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. काही जण माझ्या शरीराची स्थिती माझ्यापेक्षा जास्त जाणतात, अशा प्रकारे दावे केले जात आहेत, हे दुर्दैवी आहे,” असे त्याने स्पष्ट केले.
स्टार्कने पुढे सांगितले की, या दुखापतीमुळेच तो वेळेत दिल्ली कॅपिटल्ससोबत जोडू शकला नाही. “मी आयपीएल 2026 च्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध नाही. याबद्दल मी दिल्लीच्या चाहत्यांची माफी मागतो. मात्र, माझ्या फिटनेसबाबत मी नियमित माहिती देत राहीन,” असेही त्याने नमूद केले.
दरम्यान, स्टार्कच्या फिटनेसबाबत त्याची पत्नी एलिसा हीली हिनेही यापूर्वी माहिती दिली होती. तिने सांगितले होते की, स्टार्क अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसून तो सध्या गोलंदाजीही करू शकत नाही. त्यामुळे त्याच्या मैदानात उतरण्यास अजून वेळ लागणार आहे.
मागील आयपीएल हंगामात स्टार्कने 14 सामन्यांत 17 बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजी आक्रमणात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. अशा परिस्थितीत हंगामाच्या सुरुवातीलाच त्याची अनुपस्थिती संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन केव्हा मैदानात परततो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.