Nanded News – प्रशिक्षण केंद्राच्या नावावर जुगार; ४१ जणांना अटक, ११ लाख ४७ हजाराचा मुद्देमाल जप्त

नांदेड शहराजवळील कामठा गावात सुरु असलेल्या पपलू नामक जुगार अड्यावर आयजीच्या विशेष पथकाने काल रात्री धाड टाकून तब्बल ४१ जणांना अटक केली. यात ११ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

काल रात्री पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस कर्मचारी प्रदीप खानसोळे, राजू जिंकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी व इतर सहकार्‍यांनी कामठा येथे एका जुगार अड्यावर धाड टाकून ११ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार सदरची कारवाई करण्यात आली. कामठा येथे सदर जुगार अड्यावर जुगार्‍यांना जुगार खेळण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. सदर प्रशिक्षण केंद्र हे राज कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ चिंचवडगाव ता.वडवणी जि.बीड यांच्यामार्फत चालविण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली. जगनलाल देवीलाल यादव यांच्या मालकीच्या जागेच असलेल्या टिनशेडमध्ये सदरच्या संस्थेमार्फत पपलू नावाचा जुगार गेल्या काही दिवसापासून सुरु होता. याठिकाणी जुगार खेळण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. पंकज इंगळे व त्यांच्या पथकाने याठिकाणी धाड टाकून ४१ जुगार्‍यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकली असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

या कारवाईत गोविंद चव्हाण, शुभंम ठाकूर, गुणवंत उर्फ सानू जगन्नाथ ठाकूर, आकाश पलनाडे, शेख रफिक शेख मनीर, नावेद अब्दुल हमीद, इरफान महंमद नुरी, सुरेश बहारे, भिकाजी पगारे, शिवा ठाकूर, जावेद अहेमद, खान फैसल, पांडूरंग बंधागर, अब्दुल वाहीद अब्दुल खलील, राहुल जनार्धान ठाकूर, नारायण भारती, प्रकाश बालाजीराव येनवाड, दिलीप शिंदे, समीर कोठडीया, असिफ, शेख फय्याज शेख नईम, महंमद शाहरुख महंमद कलीम, माधव डोंगरे, राजेश वाखळे, शिवराज परमार, राजू कुडल यांच्यासह एकूण ४१ जणांना अटक करण्यात आली. एखाद्या संस्थेमार्फत जुगार खेळण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याने हा प्रकार एकदम धक्कादायक असल्याचे मानले जाते. विमानतळ पोलिसांना याची साधी खबरही नव्हती. मात्र पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाला याची गोपनिय माहिती मिळाली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सदर प्रकरणातील सर्व आरोपी हे गाडेगाव, नांदेड येथील असल्याचे वृत्त आहे.

Comments are closed.