इंडोनेशियाचा मोठा निर्णय, १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर घातली बंदी
मुलांच्या मानसिक आरोग्याचे रक्षण आणि सायबर सुरक्षिततेसाठी इंडोनेशिया सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापरावर इंडोनेशियाने अधिकृतपणे बंदी घातली असून, असा कठोर निर्णय घेणारा तो दक्षिण-पूर्वी आशियातील पहिला देश ठरला आहे. हा नवीन नियम आजपासून लागू करण्यात आला असून, यामुळे इंडोनेशियातील डिजिटल वातावरणात मोठे बदल होणार आहेत.
इंडोनेशियाच्या संवाद आणि डिजिटल व्यवहार मंत्री मेयुत्या हफीद यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, मुलांचे वाढते सोशल मीडियाचे व्यसन, सायबर बुलिंग आणि ऑनलाइन फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी हा कायदा अनिवार्य करण्यात आला आहे. या नवीन नियमांनुसार, १६ वर्षांखालील मुलांना फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक, यूट्यूब आणि एक्स यांसारख्या प्लॅटफॉर्मवर स्वतःचे खाते उघडता येणार नाही. तसेच हाय रिस्क श्रेणीत येणाऱ्या गेमिंग आणि लाइव्ह स्ट्रीमिंग ॲप्सवरही ही बंदी लागू असेल.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्यांना त्यांचे वय पडताळणीचे निकष कडक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एलॉन मस्क यांच्या एक्स प्लॅटफॉर्मसह अनेक जागतिक कंपन्यांनी इंडोनेशियाच्या या नवीन वयोमर्यादेचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर इंडोनेशिया सरकारकडून कडक दंडात्मक कारवाई किंवा थेट बंदी घातली जाऊ शकते.
Comments are closed.