जेजुरीतील हॉटेल व्यवसाय संकटात! १३ दिवसांपासून सिलेंडरचा पुरवठा ठप्प
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीत गेल्या १३ दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद असल्याने हॉटेल व्यवसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. ऐन लग्नसराई आणि यात्रांच्या हंगामात सिलेंडर मिळत नसल्याने येथील अर्थव्यवस्था ढासळण्याची भीती निर्माण झाली असून, अनेक हॉटेल मालकांनी आपले व्यवसाय बंद ठेवण्याचा किंवा मर्यादित स्वरूपात चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
हॉटेल असोसिएशनची तातडीची बैठक
जेजुरीतील हॉटेल व्यावसायिकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जेजुरी शहर हॉटेल संघटनेची शिवानंद हॉटेलमध्ये तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत १३० हून अधिक हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. ७ मार्चपासून स्थानिक गॅस एजन्सीकडे सिलेंडरचा साठा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. शासनाने हॉटेल व्यवसायासाठी २० टक्के सिलेंडर कोटा जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात एकही सिलेंडर मिळालेला नाही, अशी तक्रार व्यावसायिकांनी केली आहे.
मेनू कार्डमधून अनेक पदार्थ गायब; चायनीज, दाक्षिणात्य पदार्थ बंद
गॅसअभावी हॉटेलमधील शेगड्या विझल्या असून व्यावसायिकांना चुलीचा आधार घ्यावा लागत आहे. शिवानंद हॉटेलचे मालक विजय झगडे यांनी सांगितले की, “आमच्याकडे एरवी २५० पदार्थ मिळायचे, पण आता केवळ १० पदार्थ दिले जात आहेत. चुल आणि शेगडीवर ८० कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्राहकांची गरज पूर्ण करणे अशक्य होत आहे.”
इंधनाचे दर गगनाला; लाकूड-कोळसा महागला
गॅस नसल्यामुळे व्यावसायिकांनी चुली पेटवल्या आहेत, मात्र लाकूड आणि कोळशाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ४ रुपये किलोने मिळणारे लाकूड आता १२ रुपयांवर पोहोचले आहे, तर कोळसा ५० रुपये किलोने विकत घ्यावा लागत आहे. यामुळे हॉटेल चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे राहिलेले नाही.
मंत्र्यांची घेणार भेट
येत्या काळात चैत्र-वैशाख महिन्यातील यात्रा, लग्नसराई आणि शालेय सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी वाढणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन हॉटेल असोसिएशनचे शिष्टमंडळ लवकरच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे. “जेजुरी हे तीर्थक्षेत्र असल्याने येथील हॉटेल व्यवसायाला त्वरित सिलेंडर पुरवठा करावा, अन्यथा येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल,” असा इशारा विजय झगडे यांनी दिला आहे.
या संदर्भात पुरंदरचे पुरवठा अधिकारी गोपाल ठाकरे यांनी सांगितले की, “सध्या शासनाच्या आदेशानुसार केवळ रुग्णालये आणि शाळांनाच प्राधान्याने सिलेंडर पुरवले जात आहेत. हॉटेल व्यवसायासाठी राखीव असलेला २० टक्के कोटा उपलब्ध होताच त्याचे वितरण तातडीने सुरू केले जाईल.”
Comments are closed.