युरोपात १२ टन किटकॅटची चोरी, अचानक गायब झाला चॉकलेटने भरलेला ट्रक!
युरोपमध्ये आपल्या लोकप्रिय किटकॅट चॉकलेट्सचा एक मोठा साठा चोरीला गेला आहे, असे खाद्यपदार्थ क्षेत्रातील मोठी कंपनी नेस्लेने म्हटले आहे. या घटनेमुळे युरोपमध्ये इस्टर डे पूर्वी चॉकलेटचा तुटवडा निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, अंदाजे 4,13,793 चॉकलेट्स घेऊन जाणारा एक ट्रक वाहतुकीदरम्यान गायब झाला. त्या मालाचे एकूण वजन अंदाजे 12 टन होते. हा ट्रक उत्पादन युनिटकडून वितरण केंद्राकडे जात असताना वाटेतच गायब झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तो ट्रक इटलीहून पोलंडकडे जात होता. तसेच वाटेतील अनेक युरोपीय देशांसाठी चॉकलेट्स घेऊन जात होता. कंपनीने ट्रक गायब झाल्याचे ठिकाण उघड केलेले नाही. परंतु आतापर्यंत त्याचा कोणताही पुरावा हाती लागलेला नाही.
नेस्लेने इशारा दिला आहे की, या चोरीचा बाजारावर थेट परिणाम होऊ शकतो. इस्टरसारख्या मोठ्या सुट्ट्यांपूर्वी किटकॅट्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे पुरवठ्यात कमतरता भासल्यास ग्राहक नाराज होऊ शकतात. कंपनीला भीती आहे की, चोरीला गेलेले चॉकलेट्स युरोपमधील अनधिकृत किंवा काळ्या बाजारात विकली जाऊ शकतात. कंपनी स्थानिक अधिकारी व पुरवठा भागीदारांच्या सहकार्याने या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
कंपनीने स्पष्ट केले की, प्रत्येक किटकॅट बारवर एक विशिष्ट बॅच कोड असतो. ज्याचा वापर चोरीची उत्पादने ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो. एखादे संशयास्पद चॉकलेट आढळल्यास, ते स्कॅन करून कंपनीला तात्काळ सूचित केले जाऊ शकते. या घटनेमुळे केवळ पुरवठा साखळीच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही तर, सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी समस्याही निर्माण होऊ शकतात.
Comments are closed.