संधीही आहे आणि वेळही; इशान, अभिषेक अन् हेड यांचे त्रिकुट करणार का 300 धावांचा महाविक्रम?

असे म्हणतात ना, ‘संधीही आहे आणि वेळही!’ आज आरसीबी (RCB) आणि एसआरएच (SRH) यांच्यातील सामना त्याच चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे, जिथे दोन वर्षांपूर्वी हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. तेव्हाही आरसीबीने टॉस जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. आयपीएल २०२६ चा हा सलामीचा सामना असून, हवेत एकच मोठा प्रश्न तरंगतोय – सनरायझर्स हैदराबादचा संघ पहिल्याच सामन्यात आपला जुना विक्रम मोडून ३०० धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठणार का? कारण स्पष्ट आहे; गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ या सामन्यात आपल्या मुख्य गोलंदाजीच्या ताकदीशिवाय मैदानात उतरण्यास भाग पडला आहे. आरसीबीचे तीन महत्त्वाचे गोलंदाज – जोश हेझलवूड, यश दयाल आणि नुवान तुषारा या सामन्यात खेळणार नाहीत.

​म्हणजेच, आरसीबीकडे त्यांची ‘फर्स्ट चॉईस’ गोलंदाजीची तिघडी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत उर्वरित गोलंदाजांवर दडपण येणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी सध्या आयपीएलमधील सर्वात धोकादायक ‘ओपनिंग लाईनअप’ मानली जात आहे. पॉवरप्लेमध्ये तुफान फटकेबाजी करणारा इशान किशन, वेगवान सुरुवातीचा तज्ज्ञ अभिषेक शर्मा आणि मोठ्या सामन्यांचा खेळाडू ट्रॅव्हिस हेड; हे तिघे मिळून अनेकदा पॉवरप्लेच्या सहा षटकांतच सामन्याचे चित्र पालटून टाकतात.

​तसे पाहिले तर आयपीएलमध्ये आतापर्यंत ३०० धावांची खेळी पाहायला मिळालेली नाही, पण हा सनरायझर्स हैदराबादचाच संघ आहे ज्याने गेल्या दोन हंगामात २८७, २८६, २७८ आणि २७७ अशा चार मोठ्या धावसंख्या उभ्या केल्या आहेत. त्यातच आता सपाट खेळपट्टी (Flat Pitch), लहान बाउंड्री आणि ‘इम्पॅक्ट प्लेयर’चा दुहेरी फायदा मिळतो. या सामन्यात तर हैदराबादसमोर तुलनेने कमकुवत गोलंदाजी आहे, त्यामुळे हे सर्व घटक हैदराबादच्याच बाजूने झुकताना दिसत आहेत.

​जर हैदराबादचे हे तीन धडाकेबाज फलंदाज फॉर्मात आले, तर धावफलकावर २५० चा टप्पा ओलांडणे सहज शक्य आहे आणि निश्चितच ३०० धावांचा आकडाही पार होऊ शकतो. अशा स्थितीत आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात नवनिर्वाचित कर्णधार इशान किशनच्या नेतृत्वाखाली हैदराबादला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. यामुळे ते इतर संघांना एक कडक इशारा देऊ शकतील आणि पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत युवा कर्णधाराला तो आत्मविश्वास मिळेल, ज्याची त्याला या नव्या इनिंगच्या सुरुवातीला नितांत गरज आहे.

​विशेष म्हणजे, १५ एप्रिल २०२४ रोजी जेव्हा आयपीएलने २८७ धावांचा डोंगर पाहिला होता, तेव्हाही हेच दोन संघ समोरासमोर होते आणि मैदानही हेच चिन्नास्वामी स्टेडियम होते. तेव्हा हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेडने केवळ ४१ चेंडूत १०२ धावा कुटल्या होत्या, तर अभिषेक शर्माने २२ चेंडूत ३४ धावा केल्या होत्या. तसेच हेनरिक क्लासेनने ३१ चेंडूत ६७ आणि एडन मार्करमने १७ चेंडूत ३२ धावांचे योगदान दिले होते. पण या सर्वांपेक्षा वेगवान फलंदाजी अब्दुल समदने केली होती; ३७० च्या स्ट्राईक रेटने समदने अवघ्या १० चेंडूत ३७ धावा चोपल्या होत्या. हैदराबादच्या २८७ धावांच्या प्रत्युत्तरात आरसीबीनेही जोरदार झुंज दिली होती, मात्र ७ बाद २६२ धावांपर्यंतच त्यांची मजल गेली आणि त्यांनी तो सामना २५ धावांनी गमावला होता.

​आरसीबीला या धोकादायक त्रिकुटाच्या प्रहारापासून वाचण्यासाठी चोख रणनीती आखावी लागेल. भुवनेश्वर कुमार आणि फिरकीपटूंचे योग्य समीकरण जुळवावे लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्णधार रजत पाटीदार आणि अनुभवी विराट कोहली यांना संघाच्या क्षेत्ररक्षणावर विशेष लक्ष द्यावे लागेल, जेणेकरून गोलंदाजांना योग्य साथ मिळेल आणि गोलंदाजी बिनचूक होईल. डेथ ओव्हर्समध्ये कमीत कमी धावा देण्यासोबतच संपूर्ण सामन्यात सातत्याने विकेट्स घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण एक छोटीशी चूकही सामना हैदराबादच्या बाजूने झुकवू शकते.

​त्यामुळे, आयपीएलच्या या पहिल्याच सामन्यात जर हैदराबादच्या फलंदाजांचे वादळ घोंगावले, तर ३०० धावांचा ऐतिहासिक आकडा पार होऊ शकतो. पण जर आरसीबीने आपली जादू दाखवली, तर हा सामना एक संस्मरणीय ‘क्लासिक थ्रिलर’ ठरेल.

Comments are closed.