आर. अश्विन पुन्हा मैदानात उतरणार! निवृत्तीनंतर परदेशातील मोठ्या लीगमध्ये गाजवणार मैदान

आर. अश्विनने (R. Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय क्रिकेट इतिहासातील महान गोलंदाजांपैकी एक मानला जाणारा अश्विन आता निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करताना दिसणार आहे. निवृत्तीनंतर तो ‘बिग बॅश लीग’ खेळणार होता, परंतु दुखापतीमुळे त्याने त्यातून नाव मागे घेतले होते. आता तो अमेरिकेतील ‘मेजर लीग क्रिकेट’ (MLC) या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.

रविचंद्रन अश्विनला मेजर लीग क्रिकेटमधील ‘सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स’ या संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. तो MLC 2026 मध्ये खेळणार असून, या स्पर्धेत सहभागी होणारा तो भारताचा पहिला माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे. 39 वर्षीय अश्विन शेवटचा जुलै 2025 मध्ये मैदानात दिसला होता. आता जूनमध्ये सुरू होणाऱ्या मेजर लीग क्रिकेटच्या माध्यमातून तो जवळपास एका वर्षानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे.

‘ईएसपीएन’शी (ESPN) बोलताना अश्विन म्हणाला, अमेरिकेत राहणाऱ्या आशियाई लोकांकडून मिळणारे प्रेम पाहून मला येथे क्रिकेटसाठी मोठी संधी असल्याचे जाणवले. तरुण खेळाडू आणि अमेरिकेत स्थायिक झालेल्या लोकांमध्ये या खेळाबद्दल दिसलेली ओढ पाहून मला MLC मध्ये खेळण्याची प्रेरणा मिळाली.

अश्विनचा टी-20 क्रिकेटमधील रेकॉर्ड अत्यंत जबरदस्त आहे. त्याने भारतासाठी 65 सामन्यांत 23.22 च्या सरासरीने 72 विकेट्स घेतल्या आहेत, तर त्याची इकॉनॉमी 6.90 इतकी राहिली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही त्याचा समावेश होतो. त्याने 5 वेगवेगळ्या संघांसाठी एकूण 221 आयपीएल सामने खेळले असून 187 विकेट्स घेतल्या आहेत. आता अश्विन अमेरिकेच्या खेळपट्टीवरही आपल्या फिरकीची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

Comments are closed.