IPL 2026: हैदराबादचा 6 विकेट्सने धुव्वा उडवत आरसीबीची विजयी सुरुवात; कोहली-पडिक्कलची दमदार खेळी
आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) सनरायझर्स हैदराबादवर 6 गडी राखून मात करत 19 व्या हंगामाची दिमाखात सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 9 बाद 201 धावांचे डोंगरासारखे आव्हान उभे केले होते. मात्र, आरसीबीने हे आव्हान केवळ 15.4 षटकांत 4 बाद 203 धावा करून लीलया पेलले.
आरसीबीच्या विजयात विराट कोहलीने (Virat Kohli) सिंहाचा वाटा उचलला. त्याने 38 चेंडूंत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या जोरावर नाबाद 69 धावांची खेळी केली. हैदराबादकडून डेविन पेनने सर्वाधिक 2 बळी घेतले.
202 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात फिल सॉल्ट (8 धावा) स्वस्त्यात बाद झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 45 चेंडूंत 101 धावांची स्फोटक भागीदारी केली. पडिक्कलने 26 चेंडूंत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 61 धावा करत सामना आरसीबीच्या बाजूने झुकवला. 9 व्या षटकात 110 धावांवर पडिक्कल बाद झाल्यानंतर कोहलीने कर्णधार रजत पाटीदारसोबत 22 चेंडूंत 53 धावांची भागीदारी करत विजयाचा वेग कायम ठेवला. पाटीदारने 12 चेंडूंत 31 धावा (2 चौकार, 3 षटकार) केल्या. त्यानंतर जितेश शर्मा शून्यावर बाद झाला, ज्यामुळे आरसीबीची धावसंख्या 13 षटकांत 4 बाद 164 अशी झाली.
शेवटच्या 42 चेंडूंमध्ये आरसीबीला विजयासाठी फक्त 38 धावांची गरज होती. विराट कोहली आणि टिम डेव्हिड यांनी चौथ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. आरसीबीचा हा दिमाखदार खेळ पाहून यंदाही ते जेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे दिसून येत आहे.
Comments are closed.