समाजभान – चित्ती असू द्यावे समाधान!

>> विजय पांढरीपांडे

समाधान, आनंद या शब्दांची व्याख्या स्वतपुरती तरी स्पष्ट करता आली पाहिजे. पण आपली समस्या ही की, आपण धुक्यात हरवलेल्या वाटेवर भरकटत असतो आणि त्या प्रवासातले पूर्णत्व समाधानाशिवाय अन्य कशातून कसे लाभणार?

आधीच कृत्रिम बुद्धिमत्ता नावाच्या भुताच्या भीतीने चिंताग्रस्त झालेल्या आपल्या पिढीला अचानक तिसऱ्या महायुद्धाला सामोरे जावे लागत आहे. आपण विकासाच्या, मानवी बुद्धीने केलेल्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा अभिमान बाळगतो. कुणी कल्पनाही केली नसेल अशी सुखे अचानक पदरात पडल्याने अचंबित होऊन समाधान व्यक्त करतो. आपलीच पाठ थोपटून घेतो अन् अचानक दुसरीकडे नरसंहार, युद्धाने अचानक सामोरा आलेला अनिश्चित भविष्याचा अंधकार बघतो. हे सगळेच, अकल्पित आहे.

आधीच आताचा युवा वर्ग एका भीतीने पछाडलेला आहे. आपण शिकायचे कशाला? मेहनत घेऊन अभ्यास करून पदवी घ्यायची कशाला? पूर्वी उत्तर सोपे होते, चांगली नोकरी मिळवायला. म्हणजेच पैसा कमवायला. पैसा का हवा? चांगले जीवन जगायला. चांगले जीवन म्हणजे काय तर उत्तम अन्न, उत्तम वस्त्र अन् उत्तम निवारा.. मग त्यात उत्तम आरोग्य, उत्तम जीवनशैली हेही आलेच. हे सगळे कशाला… तर समाधान, आनंद लाभावा म्हणून!

पण मुळात खोलात जाऊन विचार केला तर आपण नोकरीसाठी शिकत नाही. पैशासाठी सारे काही करतो. कारण जे शिकले नाहीत, पण ज्यांच्याजवळ इतर मार्गाने आलेला उत्तम पैसा आहे, ते स्वत:ला सुखी समजतातच की! याचा अर्थ उद्या एआयमुळे आपल्याला नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर घाबरून जायचे काहीच कारण नाही. कारण आपले मूळ उद्दिष्ट नोकरी नाही, पैसा आहे. हा पैसा आपण एआयकडून कामे करूनही कमावू शकतो. उलट एआय कमी वेळात अचूक काम करण्याची शक्यता असल्याने आपण आपला वाचलेला भरपूर वेळ इतर सृजनात्मक कामासाठी देऊन पैसा कमावू शकतो. जग, सरकार, समाजव्यवस्था चालवायला आपण मान मोडून, नोकरी करून, थकून भागून जी शक्ती खर्च करीत होतो, ती ऊर्जा आता आपण आपल्या आवडत्या सृजनशील कामासाठी खर्च करून आनंद प्राप्त करू शकतो.

इथे `आनंद’ या शब्दाला जास्त महत्त्व आहे. इंद्रियाला लाभते ते सुख, जे तात्पुरते असते.आपल्याला जे आवडते ते करण्याने मिळते ते समाधान. उलट आनंद ही सर्वोच्च पायरी. घेण्याने मिळते ते सुख, अन् देण्याने मिळतो ते सर्वोच्च आनंद! उत्तम नोकरी, भरपूर पैसा असलेली मंडळी सुखी-समाधानी आनंदी असतात का? मुळीच नाही. आनंदाचे परिमाण वेगळे आहे. शेकडो मैल पायपीट करीत वारी करणारे भक्त लाखो रुपयाचे पॅकेज घेणाऱ्या आयटी जोडप्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आनंदी असतात. त्यांची ब्रम्हानंदी टाळी लागलेली असते. तो काही साधासुधा आनंद नाही, एकदम ब्रह्मानंद!

ट्रम्प अन् तत्सम राष्ट्रीय नेते मंडळी किती तरी श्रीमंत आहे म्हणतात.त्या मंडळींनी सगळे सुख भोगले असेलही. पण आज अशी मंडळी सुखी, समाधानी, आनंदी आहेत का? मुळीच नाही. सगळ्यात जास्त चिंताग्रस्त श्रीमंत लोक असतात. कारण न संपणारा लोभ, हाव (Greed),  याने ते ग्रासलेले असतात.

थोडक्यात काय तर आपण शिकतो कशासाठी, जगतो कशासाठी, आपल्या जगण्याचे नेमके उद्दिष्ट काय, आपले शेवटचे गंतव्य स्थान काय, हे सगळे आपले आपल्यापुढेच स्पष्ट असले पाहिजे. समाधान, आनंद या शब्दांची व्याख्या स्वतपुरती तरी स्पष्ट करता आली पाहिजे. तो कशातून प्राप्त करता येईल हे कळले पाहिजे. पण आपली समस्या ही की, आपण धुक्यात हरवलेल्या वाटेवर भरकटत असतो. त्या प्रवासातले पूर्णत्व समाधानाशिवाय अन्य कशातूनही लाभणार नाही.

आजच्या पिढीपुढे पूर्वीपेक्षा अधिक समस्या आहेत. अधिक वेगवेगळ्या स्वरूपाची आव्हाने आहेत. आधीचा, म्हणजे भूतकाळाचा अंदाज घेऊन, भविष्याचे आडाखे, अंदाज बांधण्याचे दिवस गेलेत आता. समोरचे जग एकदम वेगळे आहे. ते आधीच्या नियमाने चालणारे नाही. भविष्य अधिकच भिन्न, अनपेक्षित, संभ्रमित असे असणार. तेच खरे आव्हान आहे. त्यासाठी गंभीर विचारपूर्वक केलेली पूर्वतयारी हवी. चलता है, हो जाएगा असा उथळ विचार आता चालणार नाही यापुढे. त्यामुळे सध्या निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती असो, की पुढे येऊ घातलेले कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान असो. यापासून पळून जाण्याचे, माघार घेण्याचे, घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. सातत्याने बदल हा जीवनाचा गुणधर्म आहे. उलट परिस्थितीनुसार स्वत: बदलणे, भविष्याच्या आकस्मिक गरजांसाठी स्वत:ला, कसलाही न्यूनगंड न बाळगता तयार करणे, यातच आता शहाणपण आहे आणि यात टिकून राहायचे तर आंतरिक शक्तीला आनंदा, समाधानाचा स्रोत उपलब्ध करून दिला पाहिजे.

Comments are closed.