इराणने घेतला बदला; सौदीतील अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला, इंधन भरणारी तीन विमाने उडवली, 12 सैनिक जखमी

इस्रायलने इराणच्या आण्विक केंद्रांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यास प्रत्युत्तर म्हणून इराणने सौदी अरबमधील ‘प्रिंस सुलतान’ या अमेरिकेच्या हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यात अमेरिकन हवाई दलातील लढाऊ विमानांमध्ये हवेत इंधन भरणारी तीन विमाने नष्ट झाली असून ‘ई-3 सेंट्री’ हे हवाई इशारा व नियंत्रण विमानदेखील उद्ध्वस्त झाले आहे. या हल्ल्यात अमेरिकेचे 12 पेक्षा जास्त सैनिक जखमी झाले आहेत. दोघे चिंताजनक आहेत. मध्य इराणमधील खोंदाब हेवी वॉटर कॉम्प्लेक्सवर शुक्रवारी अमेरिका आणि इस्रायलने दोन टप्प्यांमध्ये हल्ले केले होते. त्याचा बदला इराणने घेतला.

पाकिस्तानात होणार चर्चा

आखातात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्किये, यूएई आणि सौदी अरबचे परराष्ट्र मंत्री 30 मार्च रोजी पाकिस्तानात चर्चा करणार आहेत.

इराणमध्ये पाय ठेवाल तर शवपेटीतच जाल

अमेरिकेने इराणमध्ये भूदल पाठवून जमिनीवरील कारवाईची तयारी केल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, अमेरिकेच्या सैनिकांनी इराणमध्ये पाय ठेवल्यास ते शवपेटीतच परत जातील, असा इशारा इराणने दिला आहे. तेहरान टाईम्स या इराणमील इंग्रजी वृत्तपत्रात ‘वेलकम टू हेल’ या वृत्तातून अमेरिकेला हा इशारा दिला.

पंतप्रधान मोदी आणि मोहम्मद बिन सलमान यांच्यात चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरब क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्याशी पह्नवरून आखातातील संघर्षाबाबत संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी ऊर्जा आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणाया हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच अशा हल्ल्यांमुळे केवळ संबंधित देशांनाच नव्हे, तर संपूर्ण जगावर परिणाम होत असल्याची भूमिका पंतप्रधानांनी स्पष्ट केली. तसेच दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रातील जहाजांची वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहणे अत्यावश्यक असल्याचे मान्य केल्याचे मोदी यांनी सांगितले.

इराणचा शेजारी देशांना इशारा

इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्या देशांमध्ये अमेरिकेची सैन्य तळे आहेत, अशा सर्वच देशांना आम्ही लक्ष्य करणार आहोत. तुम्ही आमच्या आर्थिक केंद्रांना निशाणा बनवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल. सौदी अरब, कुवेत, कतार, युएई या सारख्या देशांना जर आमच्या हल्ल्यांपासून वाचायचे असेल तर, त्यांनी अमेरिकेच्या सैनिकांना आपल्या देशातून बाहेर काढावे.

हिंदुस्थानची आणखी दोन पेट्रोलियम जहाजे रवाना

हिंदुस्थानची आणखी दोन जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडत मायदेशी रवाना झाली आहेत. या जहाजांच्या सुरक्षेसाठी हिंदुस्थानी नौदल तैनात आहे. या भागातून आणखी काही जहाजे बाहेर पडण्याची अपेक्षा आहे.

पाच हिंदुस्थानी जखमी

यूएईमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पाच हिंदुस्थानी नागरिक जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

  • या तळाची हल्ल्यापूर्वीची आणि नंतरची उपग्रहातून काढलेली छायाचित्रे इराणने शेअर केली आहेत. त्यात अमेरिकेच्या विमानांचे झालेले नुकसान स्पष्टपणे दिसून येते.

दुबईवर ड्रोन डागले; कुवेत, कतार आणि बहरीनही हादरले

इराणने दुबईतील अमेरिकन सैनिकांनाही लक्ष्य केले आहे. दोन ठिकाणी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ले केले. तिथे 500 पेक्षा जास्त अमेरिकन सैनिक होते. हल्ल्यात अनेक सैनिक जखमी झाले. दुबईतील युव्रेनच्या एअर डिफेंस यंत्रणेवर इराणने हल्ला केला. ही यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचे इराणने म्हटले आहे. कुवेत, बहरीन व कतारवरही इराणने हल्ले चढवले.

Comments are closed.