भटकंती – वसंतातली सुखद भ्रमंती

<<आशुतोष बापट>>

ashutosh.treks@gmail.com

प्रत्येक ऋतूची स्वतंत्र रूपकळा असते. उन्हाळ्यात तर रंगरूपाचं हे साम्राज्य खुलं झालेलं असतं अन् अशी भ्रमंती आल्हाद देणारी ठरते.

परीक्षा संपल्या आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली की, साहजिकच वेध लागतात ते हिमालयात जाण्याचे. आपल्याकडे कडकडीत ऊन असताना तिकडे बर्फात रमणे, भटकंती करणे याची ओढ अर्थातच कोणालाही असणे स्वाभाविक आहे आणि त्यानुसार अनेक मंडळींचे पाय हिमालयाकडे वळतातसुद्धा, पण इथे महाराष्ट्रातसुद्धा उन्हाळ्यात भटकायचे पर्याय आहेतच की. कोकण हा त्यातलाच एक सुंदर पर्याय. कोकण हा खरे तर असा प्रदेश आहे की, जिथे वर्षातले बाराही महिने गेले तरी निसर्ग आपली निरनिराळी रूपे दाखवत असतो आणि म्हणूनच ऐन उन्हाळ्यात म्हणजे वसंत ऋतू फुललेला असताना कोकणात जायलाच हवं.

डोक्यावर टोपी, डोळ्याला गॉगल आणि अंगात सुती कपडे हे पथ्य पाळून प्रवास केला तर ऐन उन्हाळ्यातही कोकणातली भटकंती खूप छान होते. खरे तर गाडीच्या काचा उघडय़ा ठेऊन केलेली भटकंती फारच रमणीय असते. आंबा, काजू यांच्या मोहोराचा वास मनसोक्त घेता येतो. त्याचसोबत अबोली, सुरंगी, करवंद आणि कुडा यांची फुललेली फुले कधीही थांबून पाहता येतात.

मुळात वसंत ऋतू असल्यामुळे आंबा, फणस, काजू, करवंद, जांभूळ, जांब ही फळं याच वेळी मिळतात. अनेक वृक्षांची पाने गळत असल्यामुळे त्यावर बसणारे पक्षी पाहणे ही पक्षीनिरीक्षकांसाठी मोठी पर्वणी असते. वृक्ष जरी निष्पर्ण झाले तरीसुद्धा पळस, पांगारा, सावर, बहावा या झाडांना येणारी फुलं ही ऐन उन्हाळ्यात केवळ अप्रतिम दिसतात. विविध रंगांची उधळण या वेळी रानोमाळ झालेली पाहता येते. पक्ष्यांची तर गणनाच करायला नको एवढे पक्षी कोकणात दिसून येतात. खंडय़ा, कोतवाल, वेडा राघू, भारद्वाज, स्वर्गीय नर्तक, तांबट असे सुंदर, देखणे आणि गोड आवाजात गाणारे पक्षी बघायला मुद्दाम कोकणात जायला हवे.

कोकणाला समृद्ध समुद्रकिनारा लाभला असल्यामुळे मुद्दाम किनाऱयाच्या गावात राहणे हा उत्तम पर्याय आहे आणि आता तर सागरी महामार्ग झालेला असल्यामुळे कोकणातल्या दोन ठिकाणांमधील अंतर खूपच कमी झालेले आहे. जंजिरा, जयगड, रत्नागिरी, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग असे बळीवंत जलदुर्ग कोकणात आपली वाट पाहत आहेत. जयगड किल्ल्यावरून समुद्र अफाट दिसतो. तिथेच शेजारी जिंदाल कंपनीने बांधलेले गणपतीचे मंदिर आणि त्याच्या बाहेर केलेला बगीचा आवर्जून पाहण्याजोगा आहे. जयगड किल्ल्याच्याच शेजारी असलेले कऱहाटेश्वराचे शिवालय खास वाट वाकडी करून बघून यावे. त्याचसोबत परिसरात असलेले कोलीसरे इथले लक्ष्मीकेशव मंदिर आणि तिथली प्राचीन विष्णूमूर्ती पाहून थक्क व्हायला होते. तसेच पुढे आले की, कवी केशवसुत यांचे जन्मस्थान असलेले मालगुंड, आरे-वारे समुद्रकिनारा, गणपतीपुळे ही ठिकाणे ऐन उन्हाळ्यात भेट द्यावीत अशी आहेत.

अगदी दिवेआगरपासून ते वेंगुर्ल्यापर्यंत अनेक सागरकिनारे मुद्दाम भेट द्यावेत असे आहेत आणि जिथे असतील तिथली दीपगृहे न चुकता पाहावीत. आमरस, बिरडय़ाची उसळ, ओल्या काजूची उसळ, उकडीचे मोदक, फणसाचे सांदण, शेवया आणि नारळाचा रस, सोलकढी, कुळथाचे पिठले अशा अस्सल कोकणी पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घ्यावा.

ऐन झाडीत वसलेली विविध देवस्थाने आणि मंदिरे मुद्दाम पाहावीत. त्यांचे फरसबंद प्रकार, लाकडी सभामंडप आणि त्यावर केलेली नक्षी, दगडी मंदिरांमुळे आलेला गारवा अनुभवायला याच दिवसात तर कोकणात जायला हवे. कुठल्याही सडय़ावरून भटकताना करवंदीच्या जाळ्या फुललेल्या असतात. मनमुराद भटकंती करून संध्याकाळी समुद्रावर जावे. मावळत्या दिनकराला समुद्रकिनाऱयावर निरोप देणे यासारखे दुसरे सुख नाही. पूर्ण अंधार पडल्यावर वरती आकाशात लक्षावधी ताऱयांनी काढलेली रांगोळी बघावी. चांदण्या रात्री समुद्राच्या वाळूवर पायपीट करावी. चंद्राच्या प्रकाशात चमकणाऱ्या लाटा आणि लांबवर मासेमारीसाठी गेलेल्या होडीतले लुकलुकणारे दिवे बघावेत.

ऐन उन्हाळ्यात कोकणात जावे. वसंत ऋतूने बहरलेला सगळा परिसर मनमुराद भटकावा. आपले गाव कोकणात असेल तर गावचा देव किंवा देवीच्या राउळात घालवलेला वेळ स्मरणीय असतो. पुन्हा आपल्या गावी निघताना देवाचे घेतलेले दर्शन, गुरवाकडून देवाला घातलेले गाऱ्हाणे आणि तिथून निघताना जड झालेले डोळे व पाय, आपली पाळेमुळे याच कोकणच्या मातीत किती खोलवर रुजली आहेत याची आठवण करून देतात. शांत, निवांत आणि नितांत सुंदर कोकणात उन्हाळ्यात एकदा तरी मुद्दाम जावेच!

 

Comments are closed.