रोखठोक – हिंदुत्व आणि अध्यात्माचे शोषण… कॅ. खरात बाबा सलीम, अब्दुल असता तर…

पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात भोंदूगिरी व बाबागिरीचे उदंड पीक आले आहे. अध्यात्मवादी बुवा, महाराजांच्या टोळ्या बनवून त्यांना भाजपच्या प्रचारात उघडपणे जुंपले जाते. त्यामुळे खरे हिंदुत्व लयास गेले. कॅ. खरातच्या जागी एखादा सलीम, अब्दुल, सुलेमान असता तर भाजपने महाराष्ट्राला आग लावायला मागेपुढे पाहिले नसते.

महाराष्ट्रात सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्या सर्व पाहता संतांची, समाजसुधारकांची हीच भूमी असे म्हणताना यापुढे जीभ अडखळेल. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा शिवतीर्थावर पार पडला. हा महाराष्ट्र कोणी घडवला व महाराष्ट्र मोठा का? हे स्पष्ट करणाऱ्या, विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या थोर लोकांची महती श्री. राज ठाकरे यांनी सांगितली. नव्या पिढीला त्यापैकी अनेक विभूतींची नावे माहीत नसावीत; पण कॅप्टन अशोक खरात हे नाव आता घराघरांत पोहोचले आहे. कारण खरात बाबासारख्यांची मोठी यादी `महात्मे’ म्हणून एक दिवस सादर करावी लागेल. नाशिक जिल्ह्यातील कॅ. खरात बाबाच्या चरणाशी महाराष्ट्राच्या राजकारणातील व मंत्रिमंडळातील अनेक तालेवार लोक बसत. खरातकडून भविष्य पाहूत घेत. पूजाअर्चा, विधी करून स्वत:ला संरक्षण कवच बनवून घेत. तोच खरात हे सर्व करताना असंख्य महिलांचे शोषण करीत होता. बलात्कार करीत होता. त्याने कोट्य़वधींची संपत्ती या भोंदूगिरीतून जमा केली. राज्य प्रशासनातले अनेक आयएएस व आयपीएस अधिकारी त्याचे भक्त आणि बिझिनेस पार्टनर होते. जे पकडले जातात ते भोंदू, पण जे असंख्य खरात आतापर्यंत पकडले गेलेले नाहीत त्यांचे काय? असा प्रश्न अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी विचारला तो खरा आहे.

प्रबोधनकारांचे फटकारे

बुवाबाजी आणि भोंदूगिरी कशी फोफावते त्याचे वर्णन एके ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे यांनी कठोर शब्दांत केले आहे. ते म्हणतात, “बुवांच्या लोकोत्तर नि लोकविलक्षण चमत्कारांच्या गप्पा स्वानुभवाच्या साक्षीपुराव्याने चोहीकडे फैलावण्यात येतात. मोठमोठे पैसेवाले, निपुत्रिक, पदवीधर, शिकलेले, संसारात पिकलेले आणि बेकर्तबगार म्हणून दैववादाला विकलेले उल्लू त्या बुवाच्या साधूपणाचा नि अवतारीपणाचा एकच डांगोरा पिटतात. त्याच्या लोकविलक्षण भलभलत्या कुकर्मावर नि बदकर्मावरही गूढ अध्यात्माची जरतारी शालजोडी पांघरतात. जिवंतपणी यात्रांचा थाट आणि मेल्यावर समाधींची देवस्थाने निर्माण होतात. त्या बुवा, महाराजांचा एक ठरावीक संप्रदाय चालू होतो.

शिष्य समुदाय आजूबाजूला तयार झालेलाच असतो. मग बुवांच्या मागे पट्टशिष्य म्हणून गादीवर कोण बसणार? या भानगडीचे तंटे लागतात. कारस्थाने चालतात, मारामाऱ्या होतात, मठात जमलेल्या द्रव्यनिधीचे, मठ, समाधी, शेतवाड्या, इमारतीच्या हक्कांचे वाद आणि तंटे, कोर्टकचेऱ्यांच्या पायऱ्या खतवू लागतात. काही वकील शिष्य या बाजूला, काही त्या बाजूला असा देखावा उभा राहतो. म्हणजे बुवांचे खरेखोटे अध्यात्म जाते बुवांच्या बरोबर समाधीत आणि मठ, समाधीच्या संसाराचे त्रांगडे लागते शिष्य-प्रशिष्यांच्या मागे. या सगळ्या उपद्व्यापात नि मोक्षसाधनेच्या हलकल्लोळात देशाची अवस्था काय आहे? मागासलेल्या श्रमजीवी जनतेच्या जिण्याची स्थिती कशी आहे? किती लोक एकवेळ जेमतेम खातात आणि किती उपासमारीने मरत आहेत? भिकारी लोकांची, लंगड्यापांगळ्या, वेड्या लोकांची संख्या का वाढत आहे? त्यांच्या जगण्या-मरण्याची कोणी विचारपूस करतात की नाही? वर्षभर शेतात राबूनही शेतकरी भिकेला का लागला? शेकडो जमातींची दिनचर्या अनेक घाणेरड्या रूढींनी कशी पाशवी अवस्थेला पोहोचली आहे? व्यसनातिरेकांनी कुटुंबेच्या कुटुंबे उकिरड्यावर कशी झुगारली जात आहेत? सावकारांचा आणि सत्ताधाऱ्यांचा जुलूम गावोगाव कसा होत आहे? इत्यादी प्रश्नांची त्या मठ-पीठ-पूजक अध्यात्मवादी गबरूंना चिंता, पर्वा, दिक्कत लवमात्र नसते. `तू तो राम सुमर, जग लढवा दे’ हा एकच त्यांचा खाक्या. बुवाबाजीच्या जाळ्यात अडकलेल्या हरएक बाई-बुवाची विवंचना स्वर्गलोकच्या साधनासाठी. तेवढ्यासाठी मारे कथा, कीर्तने, पुराणे नि भजनाचा आटोकाट अट्टहास अखंड चालू. कथा, कीर्तनांनी केले काय? कथा, कीर्तने, पुराणे आणि भजने या संस्था बऱ्याच जुन्या आहेत. लोकांत धर्मजागृती केल्याची पुण्याई त्यांच्या पदरात बांधण्याचा तो एक संभावित शिरस्ता आहे. ती धर्मजागृती कोणती? कथा, कीर्तन, पुराण, भजन, वाटेल ते ऐका. त्यात प्रवचनाचा मुख्य ओढा गूढ अशा अध्यात्माच्या काथ्याकुटाकडे. ते अध्यात्म खुद्द कथाकाराला नि पुराणकारालाही उमजलेले नसायचे. फक्त पोथीतल्या जडबंबाळ शब्दांची ते नुसती पोपटपंची करतात. आत्मा, परमात्मा, योगसिद्धी, समाधी, गुरुपदेश, सदेही, विदेही मोक्ष इत्यादी शब्दांची भरमसाट पेरणी केली की, चढला कथा-पुराणाचा रंग.”

हे विचार प्रबोधनकार ठाकरे यांचे आहेत. धर्मजागृतीच्या नावाखाली सध्या ज्या बुवाबाज लोकांचे कळस व अध्यात्म सेना नामक प्रकार भाजपच्या छत्राखाली सुरू झाले, त्यात असंख्य खरात बाबांचाही समावेश आहे. खरात बाबाच्या घरात पूजाविधीसाठी येणाऱ्या लोकांची छायाचित्रे पाहिली की, हा खरात बाबा कोणत्या पक्षाचा प्रचारक होता ते सहज लक्षात येईल. बच्चू कडू यांना `बाबा’ आशीर्वाद देतोय की, भाजपच्या मंत्रिमंडळात मंत्री बनून मला भेटायला या. या खरात बाबाचे सगळ्याच प्रमुख सत्ताधारी व राजकीय लोकांसोबत फोटो आहेत. हे चित्र पाहिल्यावर महाराष्ट्र कोणत्या अधोगतीला लागला याचे किळसवाणे प्रदर्शन होते.

भोंदूबाबांचा पक्ष

मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या पक्षाने निवडणुकीत प्रचारासाठी व मते मिळवण्यासाठी अशा असंख्य भोंदूबाबांचे सहकार्य घेतले. हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या संघटनांच्या माध्यमातून ही अनोखी धर्मजागृती होत असते. भोंदूगिरी म्हणजेच हिंदुत्व असे ठसवले जाते. विधानसभा, लोकसभा प्रचारात या बाबा, महाराज, कीर्तनवाल्यांना रोखीत पैसे मोजून प्रचारात उतरवले जाते. हरयाणा-पंजाबात रामरहिमसारखे बाबा व महाराष्ट्रात खरात बाबा, कधीकाळी आसाराम बापूही भाजपचे हिंदुत्वरक्षक, प्रचारक होते. समाजात धर्मांधता वाढवायची, लव्ह जिहाद, मंदिर-मशिदीसारखे प्रश्न उभे करायचे व हिंदुत्व खतऱ्यात असल्याची `बांग’ मारायची हे यांचे धंदे. `लव्ह जिहाद’, हिंदू-मुसलमान प्रेमविवाह प्रकरणात त्या गावात घुसून हैदोस घालणारे गोपीचंद पडळकर, संग्राम जगतापसारखे `अध्यात्मवादी’ लोक खरात प्रकरणात शेपूट घालून बसले. खरातने असंख्य हिंदू महिलांना फसवले व शोषण केले. खरातचे नाव सलीम, अब्दुल, सुलेमान असते तर हे गोपीचंद, जगताप वगैरे लोक तोफा व रणगाडे घेऊनच नाशकात घुसले असते व हिंदुत्व धोक्यात असल्याच्या गर्जना करीत मोर्चे, आंदोलनाची ठिणगी टाकून वणवा पेटवला असता. नाशिक जिल्हय़ातील इतर काही बाबांनी महिलांचे शोषण केले; पण पारदार महिलेवर पोलिसी दबाव आणून गप्प करण्यात पुढाकार भाजपच्या मंत्र्यांनी घेतला व त्या बदल्यात या बाबांना विधानसभेत भाजपचा गुप्त प्रचार करण्यास भाग पाडले. हेसुद्धा एक प्रकारे महिलांचे व अध्यात्माचे शोषण म्हणायला हवे. हिंदुत्वाला लाज आणणारी ही कृत्ये आहेत. महाराष्ट्रातील अनेक भ्रष्ट राजकारणी भाजपमध्ये जाऊन शुद्ध झाले तसे या बुवा, बाबांच्या शुद्धीकरणासाठी स्वतंत्र वाशिंग मशीन भाजप कार्यालयात आणलेले दिसते. फडणवीसांचे सरकार हे अंधश्रद्धेच्या विधीतून, रेडय़ा-बकऱ्यांचे बळी देऊन आणले. हेच `बळीभाई’ सातत्याने खरात बाबाच्या दरबारात पूजाअर्चा करून फडणवीसांचे राज्य उलथवण्याची अध्यात्म सेवा करीत होते.

भोंदूगिरी, बुवाबाजी, दैववादाच्या भ्रमाने लोकांची मने साफ मारून टाकली आहेत. राष्ट्रभक्ती नष्ट झाली आहे. राज्यकर्ते भविष्य पाहायला ज्योतिष्याकडे जातात व शेतकरी, कष्टकरी अंधकारमय भविष्याच्या खाईत ढकलला जातोय.

खरात बाबाच्या प्रत्येक राजकीय भक्तावर कारवाई झाली तरच बरे होईल.

ट्विटर – @rautsanjay61
Gmail – [email protected]

Comments are closed.