न्यू हॉलीवूड – अमेरिकन पडझडीचा चित्रपटीय प्रतिध्वनी

<<अक्षय शेलार>>

[email protected]

सिनेमा या माध्यमाबद्दल, वास्तव आणि प्रतिमा यांमधील नात्याबद्दल व अमेरिकन राजकारणातील गूढ संशयांबद्दल बोलणारा हा चित्रपट न्यू हॉलीवूडच्या वारशातील एक महत्त्वाचा विचार करायला भाग पाडणारा टप्पा ठरतो.

ब्रायन डी पाल्माचा `ब्लो आऊट’ (1981) हा न्यू हॉलीवूडच्या उत्तरार्धात निर्माण झालेला असा चित्रपट आहे, ज्यात त्या चळवळीतील अनेक सौंदर्यदृष्टी आणि चिंतन एकवटलेले दिसतात. वरकरणी हा राजकीय थ्रिलर आहे, पण प्रत्यक्षात तो सिनेमा या माध्यमाबद्दल, वास्तव आणि प्रतिमा यांमधील नात्याबद्दल व अमेरिकन राजकारणातील गूढ संशयांबद्दल बोलणारा चित्रपट आहे. डी पाल्माने आल्फ्रेड हिचकॉकच्या थरार परंपरेला आधुनिक राजकीय अस्थिरतेशी जोडून एक वेगळी सिनेमा भाषा तयार केली.

चित्रपटाचा नायक जॅक टेरी (जॉन ट्रव्होल्टा) हा हॉरर चित्रपटांसाठी ध्वनी रेकॉर्ड करणारा साऊंड टेक्निशियन आहे. एका रात्री तो नैसर्गिक ध्वनी टिपण्यासाठी बाहेर जातो आणि योगायोगाने एका कार अपघाताचा आवाज आपल्या टेपमध्ये रेकॉर्ड करतो. सुरुवातीला तो साधा अपघात वाटतो, पण जॅक जेव्हा ती रेकॉर्डिंग पुन: पुन्हा ऐकतो, तेव्हा त्याला गोळी झाडल्याचा आवाज ऐकू येतो. हळूहळू त्याला जाणवतं की हा अपघात नव्हता, तर एक राजकीय कट होता.

या कथानकाची मध्यवर्ती कल्पना ध्वनीवर आधारित आहे. डी पाल्मा दृश्यांइतकंच आवाजालाही महत्त्व देतो. जॅक टेप पुन: पुन्हा ऐकतो, आवाजांचे तुकडे वेगळे करतो, त्यांना एकत्र जोडतो. या प्रािढयेत प्रेक्षकही त्याच्यासोबत तपासात सहभागी होतो. आवाजाचा हा अभ्यास सिनेमाच्या मूळ स्वरूपाकडे निर्देश करतो, ते स्वरुप म्हणजे: प्रतिमा आणि ध्वनी यांच्या संगमातून तयार होणारे वास्तव. यासंदर्भात `ब्लो आऊट’ हा फ्रान्सिस फोर्ड कोपोलाच्या `द कन्वर्सेशन’चे घट्ट नाते आहे. त्या चित्रपटातही ध्वनीमधून गुह्याचा उलगडा होतो, पण डी पाल्माचा दृष्टिकोन अधिक शैलीबाज आहे. तो स्प्लिट पीन, लांब ट्रकिंग शॉट्स आणि तीव्र संकलन वापरून दृश्यभाषेला नाटय़मय बनवतो. त्यामुळे चित्रपट केवळ तपास कथा न राहता सिनेमाच्या स्वतच्या रचनेवर भाष्य करणारा प्रयोग ठरतो.

`ब्लो आऊट’च्या राजकीय संदर्भालाही विशेष महत्त्व आहे. 1960 आणि 70 च्या दशकात अमेरिकेत घडलेल्या अनेक हत्याकांडांनी, विशेषत जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येने अनेकानेक कटकारस्थानांच्या सिद्धांतांना जन्म दिला होता. वॉटरगेट स्कँडलनंतर तर सत्ताकेंद्रांवरील विश्वास अधिकच ढासळला. `ब्लो आऊट’ या वातावरणातूनच जन्माला येतो. चित्रपटात अपघाताच्या मागे राजकीय शक्तींचा हात असल्याची शक्यता सूचित केली जाते आणि सत्य उघड करण्याचा प्रयत्न करणारा नायक अखेरीस एकटा पडतो.

जॉन ट्रव्होल्टाचा अभिनय या चित्रपटाचे भावनिक केंद्र आहे. त्याचा जॅक हा केवळ तपास करणारा नायक नाही. न्यू हॉलीवूडमधील इतर नायकांप्रमाणेच तोदेखील अपराधगंडाने पछाडलेला माणूस आहे. भूतकाळातील एका अपघातामुळे तो स्वतला दोष देत असतो. त्यामुळे सत्य उघड करण्याची त्याची धडपड ही वैयक्तिकदेखील आहे. मात्र शेवटी जेव्हा त्याला कळते की, सत्ता आणि माध्यमे सत्य उघडकीस येऊ देणार नाहीत व त्यामुळे सत्याला ठोस अर्थ नाही, तेव्हा त्याची असहायता अधिक तीव्र होते.

चित्रपटाचा शेवट विशेष लक्षवेधी आहे. एका उत्सवाच्या गोंगाटात घडणारा हिंसक प्रसंग आणि त्यानंतर उरलेला निराशाजनक परिणाम हा न्यू हॉलीवूडच्या निराशावादी प्रवृत्तीशी सुसंगत आहे. सत्य बाहेर येत नाही. ते एका हॉरर चित्रपटासाठी वापरल्या जाणाऱया साऊंड इफेक्टमध्ये रूपांतरित होतं. हा शेवट अत्यंत विडंबनात्मक आहे. वास्तविक दुःख हे सिनेमाच्या कृत्रिम प्रभावात बदलतं. याक्षणी `ब्लो आऊट’ सिनेमाच्या नैतिकतेवर प्रश्न विचारतो. वास्तव आणि मनोरंजन यांच्यातील सीमा कुठे आहे? एक खरा मृत्यू, एक खरा किंकाळी हे सगळं जर शेवटी चित्रपटातील `इफेक्ट’ बनून राहत असेल, तर सत्याचं महत्त्व काय उरतं? डी पाल्मा हा प्रश्न प्रेक्षकांसमोर ठेवतो.

न्यू हॉलीवूड चळवळीच्या शेवटाकडे जात असताना `ब्लो आऊट’ हा त्या काळाच्या चिंतनाचा सारांश वाटतो. 1970 च्या दशकात अमेरिकन सिनेमाने संशय, असुरक्षितता आणि नैतिक गुंतागुंत यांना पडद्यावर आणलं होतं. डी पाल्माचा हा चित्रपट त्या परंपरेचा उत्तरार्ध आहे. या परंपरेत सत्याचा शोध घेतला जातो, पण शेवटी तो शोध अपूर्ण राहतो.

आजच्या काळात `ब्लो आऊट’ अधिकच महत्त्वाचा वाटतो. माहिती आणि माध्यमांच्या स्फोटक युगात आपण सतत प्रतिमा व आवाजांनी वेढलेलो आहोत. कोणती गोष्ट खरी आणि कोणती बनावट हे ओळखणं कठीण झालं आहे. डी पाल्माने 1981 मध्ये मांडलेला प्रश्न आजच्या डिजिटल युगात अधिक तीव्रतेने जाणवतो. `ब्लो आऊट’ म्हणजे एका आवाजाचा शोध. सत्याच्या आवाजाचा शोध, परंतु त्या शोधाचा शेवट शांततेत होत नाही. उलट तो शोध एका सिनेमॅटिक प्रतिध्वनीत हरवतो. म्हणूनच हा चित्रपट न्यू हॉलीवूडच्या वारशातील एक महत्त्वाचा विचार करायला भाग पाडणारा टप्पा ठरतो.

थेट सिनेमा माध्यमाशी संबंध असलेला हा चित्रपट न्यू हॉलीवूडच्या शेवटाकडे प्रदर्शित झाला, हेदेखील त्यामुळेच संयुक्तिक ठरते. कारण `जॉज्’ आणि `स्टार वॉर्स’च्या यशानंतर ब्लॉकबस्टर युगाची सुरुवात झाली व न्यू हॉलीवूडमधील मूल्ये, आशयाच्या नव्या शक्यता मागे पडू लागल्या. हे सारे आपण आजवर या सदरात आपण पाहिलेल्या चित्रपटातील सिनीसीझमशी सुसंगतच नव्हे का?

(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)

Comments are closed.