नवलच! – जगात बेटं किती?
>> अरुण
ज्या मुंबई शहरात आम्ही राहतो ते एक द्वीप म्हणजे बेट आहे. चारही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश म्हणजे बेट किंवा द्वीप, ही साधी व्याख्या सर्वांनाच ठाऊक असते. मुंबई हे देशाच्या पश्चिम किनाऱयावरचे, महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी असलेले शहर जागतिक महत्त्वाचे आहे. एकेकाळी सात बेटांचा असलेला हा समूह आधी पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला आणि त्यांनी तो इंग्लंडच्या राजाला आंदण दिला.
इंग्रजी राजवटीत, ईस्ट इंडिया कंपनीने सात बेटं ब्रिटिश राजाकडून वार्षिक 10 पाऊण्ड (!) भाडेपट्टीवर घेतली आणि सतराव्या शतकापासून मधल्या खाडय़ांमध्ये भराव टाकून जोडणी सुरू केली. त्यापूर्वी कुलाबा, छोटा कुलाबा, मुंबई माझगाव, परळ, वरळी आणि माहीम अशा सात बेटांचा समूह होता. 19 व्या शतकात सर्व बेटं परस्परांना जोडली गेली आणि सर्वात मोठय़ा मुंबई बेटाचे नाव संपूर्ण महानगरला मिळाले. आजही मुंबईभोवती बोटीतून वर्तुळाकार फेरफटका केला जाऊ शकतो.
हिंदुस्थानातील महत्त्वाच्या बेटांपैकी अंदमान, निकोबार, लक्षद्वीप, दीव-दमण वगैरे बे आपल्याला ठाऊक असतात. तशी मुंबईजवळच गोराई, घारापुरी ही बेटं आहेतच. एकेकाळी श्रीकृष्णाची द्वारकानगरी एका बेटावरच होती. काही बेटं तर अगदी नगण्य म्हणावी अशी आहेत. एर्नाकुलमजवळच्या समुद्रातील कायर आयलाण्ड (बेट) गुंडू आयलाण्ड अशा पाच-सात बेटांची सफर आम्ही बोटीतून केली होती. तिथल्या एका बेटावर सात-आठ पिढय़ांपासून राहणारी मराठी माणसंही 1980 मध्ये भेटली होती.
तशी छोटी-मोठी मिळून आपल्या देशाचे अधिपत्य असलेली सुमारे 1382 बेटं आहेत. अंदमान-निकोबार द्वीपसमूहात त्यापैकी 572 बेटं असून त्यामधील 37 बेटांवर आदिम मानववस्ती आहे. बाकीची बेटं देशाच्या 7000 किलोमीटरच्या पूर्व-पश्चिम-दक्षिण सागरांमध्ये आढळतात. संपूर्ण जगात सुमारे 9 ते 10 लाख लहान-मोठी बेटं असून नार्वे, स्वीडन, फिनलाण्ड, जपान आणि पानडा यांना बेटांचे देश म्हटले जाते. वेस्ट इंडीजचाही अनेक बेटांचा समूह आहे. जगातील लाखो बेटांपैकी फक्त 28,478 बेटांवरच मानवी वस्ती आढळते. जगातलं सर्वात लहान बेट-राष्ट्र आहे, नारू किंवा नारु. ते केवळ 21 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं आहे. इंडोनेशिया सर्वात मोठा बेट-देश असून 17 हजार बेटांसह त्याचे क्षेत्रफळ 1 लाख 90 हजार चौरस किलोमीटर आहे तर ग्रीनलाण्डसुद्धा प्रचंड बेट असले तरी आास्ट्रेलिया बेटाला स्वतंत्र खंड म्हटले जाते.
Comments are closed.