'विराट कोहली संपला…', आरसीबीच्या विजयानंतर माजी क्रिकेटपटूची पोस्ट व्हायरल
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्ती घेतली असली तरी तो क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. शनिवारी (२८ मार्च) सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात विराटने नाबाद ६९ धावांची खेळी केली. त्याने ३८ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकार मारले. त्याच्या या दमदार खेळीने आरसीबीने हंगामाची विजयी सुरूवात केली.
विराट अलीकडच्या काळात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे, त्यामुळे त्याच्या टीकाकरांना त्याने चांगलेच उत्तर दिले आहे. आरसीबीच्या विजयानंतर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने त्याचा बचाव करणारी आणि टीकाकरांना त्याच्या दमदार कामगिरीबाबत आठवण करुन देणारी एक पोस्ट शेयर केली आहे.
कैफने एक्सवर आपले मत व्यक्त करताना लिहिले, “कल्पना करा, ऑस्ट्रेलियामध्ये दोनदा शून्यावर बाद झाल्यानंतर ते म्हणाले की विराट कोहली संपला. व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये त्याच्या शेवटच्या १० खेळी पुढीलप्रमाणे- ७४, १३५, १०२, ६५, १३१, ७७, ९३, २३, १२४ आणि या सामन्यात नाबाद ६९.”
कैफच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले, “गेल्या १० डावांमध्ये चार शतके झळकावणे ही आश्चर्यकारक बाब आहे. विराट कोहली सध्या पूर्णपणे वेगळ्या शैलीत खेळत आहे. एसआरएचविरुद्धचे नाबाद अर्धशतक हे बॉस कोण आहे हे विसरलेल्यांना एक आठवण करुन देणार होते.”
विराट, देवदत्त पड्डीकल आणि रजत पाटीदार यांनी २०२ धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शानदार फलंदाजी केली. पड्डीकलने २६ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने ६१ धावा केल्या. पाटीदारने १२ चेंडूत ३१ धावा केल्या. यामध्ये त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले. विराटने हर्षल पटेलच्या १६ व्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार आणि नंतरच्या तीन चेंडूंवर तीन चौकार मारले आणि संघाचा विजय निश्चित केला. हा सामना आरसीबीने ६ विकेट्सने जिंकला.
Comments are closed.