IPL 2026: सॉल्टच्या कॅचवरून नव्या वादाला सुरूवात, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू पंचांच्या निर्णयावर नाराज
आयपीएल २०२६ च्या हंगामाची सुरूवात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) धमाक्यात केली आहे. विराट कोहलीच्या नाबाद ६९ धावांच्या जोरावर आरसीबीने सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध २०२ धावांचे लक्ष्य केवळ १५.४ षटकात पार केले. या सामन्यावेळी घेतलेल्या एका झेलमुळे वाद निर्माण झाला आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटूने पंचांच्या फलंदाजाला बाद दिल्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आरसीबीचा फिल सॉल्ट याने घेतलेला झेल वादग्रस्त ठरत आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. १४ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हेनरिच क्लासन याने एक शॉट मारण्याच्या प्रयत्न केला आणि सीमारेषेवर उभ्या असलेल्या सॉल्टने तो उत्तमरित्या झेलला. तेव्हा तो सीमारेषेच्या खूपच जवळ होता. त्यामुळे मैदानावरील पंचांनी तो निर्णय तिसऱ्या पंचाकडे सोपवला.
रिप्लेमध्ये दिसते की, सॉल्ट मिड-विकेटच्या सीमारेषेच्या खूपच जवळ आहे. तेव्हा त्याचा पाय सीमारेषेला लागला की नाही हे सांगणे कठीण होते. तरीही तिसऱ्या पंचांनी त्यांना कुशनमध्ये कोणतीही हालचाल दिसली नाही असे म्हणत क्लासनला बाद दिले.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉ यांनी त्यांचे मत एक्सवर मांडले आहे. त्यांनी लिहिले, “मला वाटते की पाय बाउंड्री स्पंजला लागला. आरसीबीसाठी हा एक मोठा निर्णय आहे. पायाचा कोणताही भाग स्पंजला लागला नाही, हे तुम्ही कसे सांगू शकता आणि त्याची पूर्ण खात्री कशी बाळगू शकता, हे मला समजत नाही. तो स्पंज हालला.”
सॉल्टच्या त्या झेलमुळे फलंदाज बाद होता की नाही हा गोंधळ निर्माण झाला आहे, मात्र तिसऱ्या पंचांनी क्लासनला बाद दिले कारण त्यांच्याकडे त्याला नाबाद देण्याचा कोणताही निर्णायक पुरावा नव्हता.
या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकत एसआरएचला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. त्यामध्ये प्रभारी कर्णधार ईशान किशनच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर एसआरएचने २० षटकात ९ विकेट्स गमावत २०१ धावा केल्या. ईशानने ३८ चेंडूत ८० धावा केल्या. क्लासेनने ३१ धावा (२२ चेंडू) आणि अनिकेत वर्माने ४३ धावा (१८ चेंडू) केल्या. गोलंदाजीत आरसीबीकडून जेकब डफी आणि रोमारियो शेफर्डने प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना विराटबरोबर देवदत्त पड्डीकलने २६ चेंडूत ६१ धावा आणि कर्णधार रजत पाटीदारने १२ चेंडूत ३१ धावा केल्या. हा सामना आरसीबीने ६ विकेट्स जिंकला आणि डफी सामनावीर ठरला.
Comments are closed.