भोंदूबाबा अशोक खरातला 4 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 4 दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे आता खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रहावे लागणार आहे.

भोंदूगिरी, जादूटोणा आणि महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेला अशोक खरात याला रविवारी नाशिकमधील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने अधिक माहिती मिळावी यासाठी खरातला पोलीस कस्टडी मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच यावेळी न्यायालयात खरात याची बंदूक, त्याच्या मोबाईलमधील डेटा व संपत्तीची कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने विशेष पथकाची मागणी मान्य करत खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले.

खरातची होणार ईडी चौकशी

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने जाळ्यात ओढून भीती घालून महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱया अशोक खरातचे दररोज नवीन प्रताप चव्हाटय़ावर येत आहेत. महिलेवर अत्याचार केला, बनावट रत्ने व अंगठ्या देऊन आर्थिक फसवणूक केली, असे आणखी दोन गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, हवाला रॅकेट व व्याजाच्या धंद्यात त्याने शेकडो कोटींची उलाढाल केल्याचे विशेष तपास पथकाच्या चौकशीत समोर आले आहे. त्याच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होणार आहे, यामुळे त्याच्याशी संबंधितांचे धाबे दणाणले आहे.

आर्थिक व्यवहाराचे आंतरराष्ट्रीय रॅकेट

लैंगिक शोषणाच्या विकृतीचा कळस करणाऱ्या अशोक खरातचे आर्थिक फसवणुकीचे उलाढालीचे मोठे रॅकेट आहे, त्याच्या संपर्कातील विविध खात्यातील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक आणि राजकीय नेत्यांचा काळा पैसा तो व्याजाने देत होता. हवालामार्फत देश-विदेशात तो शेकडो कोटींची हेराफेरी करीत होता, अशी माहिती तपासी पथकाकडे आली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारांचा अहवाल ईडीकडे जाणार आहे, त्याच्याशी संबंधित सर्वांभोवती लवकरच ईडीचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे, यामुळे त्यांची पळापळ सुरू आहे.

Comments are closed.