आयपीएलमध्ये विराट कोहलीचा सर्वोत्तम खेळ बाकी? कसोटीमध्ये पुनरागमन करण्याचाही दिला सल्ला, वाचा सविस्तर

स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएल २०२६ च्या हंगामाची जबरदस्त सुरूवात केली. त्याने सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध (एसआरएच) २०२ धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद ६९ धावा केल्या आणि तो चांगल्या लयीत असल्याचे सिद्ध केले आहे. त्याच्या या कामगिरीने अनेकांना प्रभावित केले आहे. त्यामधील एकाने विराटमध्ये अजून खूप क्रिकेट बाकी आहे आणि त्याची निवृत्ती खूप दूर आहे, असे वक्तव्य केले आहे.

धावांचा पाठलाग करताना विराट एसआरएचविरुद्ध पूर्णपणे नियंत्रणात दिसत होता. त्याने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह आणि षटकार याचे शॉट्स पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू प्रभावित झाला आहे. त्यानंतर त्याने विराटला कसोटी निवृत्ती मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बीसीसीआयकडे त्याला कसोटीचे नेतृत्व सोपवण्याचीही विनंती केली आहे. विराटने कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्ती घेतली असल्याने सध्या तो भारताकडून केवळ वनडे प्रकारचे सामने खेळतो.

रायुडूने म्हटले, “मला असे वाटते की, आयपीएलमध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी अजून बाकी आहे. आपण आतापर्यंत जे पाहिले आहे, तो केवळ एक ट्रेलर आहे. त्याच्या बाबतीत फिटनेस ही समस्या कधीच नव्हती. मला अजूनही त्याच्यामध्ये पाच ते सहा वर्षे दर्जेदार क्रिकेट खेळण्याची क्षमता दिसते.”

“विराटने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले पाहिजे. आशा आहे की, ते कर्णधार म्हणून असेल. किमान मी तरी भारतीय क्रिकेटमध्ये पाहिलेला, ‘रेड-बॉल’ क्रिकेटमधील तो सर्वोत्तम कर्णधार ठरला आहे. त्याने नक्कीच पुनरागमन केले पाहिजे; ज्या प्रकारे तो सध्या फलंदाजी करत आहे, ते पाहता मला वाटते की त्याचे संघाबाहेर असणे ही भारतीय क्रिकेटचीच एक मोठी हानी आहे, ” असेही रायुडूने पुढे म्हटले आहे.

विराटने २०२५ मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार राहिला आहे. त्याच्या नेतृत्वात प्रथमच भारताने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका (२०१८) जिंकण्याची कामगिरी केली होती.

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात एसआरएचची सुरूवात काहीशी अडखळत झाली. प्रभारी कर्णधार ईशान किशनने ८० धावा केल्या आणि अंकित वर्माच्या साथीने संघाला २०० आकडा पार करून दिला. प्रत्युत्तरात आरसीबीने आक्रमक सुरूवात केली. विराटबरोबर देवदत्त पड्डीकल आणि रजत पाटीदार यांनीही स्फोटक खेळी केली. त्यामुळे आरसीबीने आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद २०० पेक्षा धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची कामगिरी केली.

Comments are closed.