या गुन्हेगारांना लक्षात ठेवा, मुलींच्या शाळेवर हल्ला करणाऱ्या अमेरिकन नौदल अधिकाऱ्यांचा फोटो शेअर करत इराणने दिला इशारा

इराणने अमेरिकेवर गंभीर आरोप करत मिनाब येथील मुलींच्या शाळेवरील क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी दोन अमेरिकी नौदल अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवले आहे. या हल्ल्यात सुमारे 175 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणने केला आहे.

इराणच्या भारत, दक्षिण आफ्रिका आणि नायजेरिया येथील दूतावासांनी सोशल मीडियावर या अधिकाऱ्यांचे फोटो शेअर करत त्यांची नावे जाहीर केली. लेह आर. टेट (कमांडिंग ऑफिसर) आणि जेफ्री ई. यॉर्क (एक्झिक्युटिव्ह ऑफिसर) हे यूएसएस स्प्रूअन्स या युद्धनौकेवर कार्यरत असून त्यांनी टॉमहॉक क्षेपणास्त्रांच्या तीन फेऱ्यांना मंजुरी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात 168 निरपराध मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणने केला आहे.

इराणच्या अधिकृत पोस्टमध्ये या अधिकाऱ्यांना “गुन्हेगार” असे संबोधण्यात आले असून त्यांनी अशा कारवाईचे समर्थन कसे करू शकतात, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, जिनिव्हा येथे झालेल्या चर्चेत इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी हा हल्ला “पूर्वनियोजित” असल्याचा आरोप केला. शाजारे तैय्येबेह मुलींच्या शाळेवर युद्धाच्या पहिल्याच दिवशी टप्प्याटप्प्याने हल्ला करण्यात आला आणि यात 175 हून अधिक विद्यार्थी व शिक्षकांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, अमेरिकेकडून करण्यात आलेल्या प्राथमिक लष्करी पुनरावलोकनात वेगळे चित्र समोर आले आहे. प्राथमिक अहवालानुसार, लक्ष्य निश्चित करताना जुनी माहिती (outdated intelligence) वापरली गेली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, क्षेपणास्त्र प्रत्यक्षात जवळील लष्करी ठिकाणावर डागण्याचा उद्देश होता, मात्र चुकीच्या नकाशामुळे शाळेला फटका बसला असावा.

या घटनेची चौकशी अद्याप सुरू असून महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित आहेत, विशेषतः लक्ष्य निश्चित करण्यापूर्वी माहितीची योग्य पडताळणी का झाली नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अमेरिकेने मात्र आपली भूमिका स्पष्ट करत नागरिकांच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात नसल्याचा दावा कायम ठेवला आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया देताना इराणलाच जबाबदार धरत त्यांची शस्त्र प्रणाली अनेकदा अचूक नसते, असा दावा केला.
यावर प्रत्युत्तर देताना इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाएई यांनी हल्ल्याचे व्हिडिओ फुटेज प्रसिद्ध करत अमेरिकेवर “युद्धगुन्हा” केल्याचा आरोप केला.

Comments are closed.